महेश गोंधणे-
अर्थसंकल्पीय रस्ते योजनेअंतर्गत चिखली तालुक्यातील एकलारा ते पाटोदा दरम्यान एकूण १.५ किलोमीटर लांबीचा १०० लक्ष रुपये अंदाजित किमतीचा रस्ता सन २०२३-२४ मध्ये चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आ.श्वेता महाले यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला होता. मात्र संबंधित कास्तकारांच्या शेत रस्त्यांशी निगडित अडचणींमुळे सदर रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून ठप्प पडले होते. या परिस्थितीमुळे एकलारा व पाटोदा या दोन्ही गावांतील नागरिकांना दळणवळणाच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते.
रस्त्याचे काम दीर्घकाळ बंद राहिल्याने व्यथित झालेल्या गावकऱ्यांनी तहसील विभागाकडे निवेदने सादर करून ही समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली. गावकऱ्यांची हतबलता आ.श्वेता महाले यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ हस्तक्षेप केला. आमदारांच्या मार्गदर्शनानुसार तहसीलदार विजय सवडेनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले.
आमदार महाले यांच्या निर्देशानुसार आणि तहसीलदार विजय सवडे यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार (महसूल) मुरलीधर गायकवाड यांनी दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी प्रत्यक्ष स्थळाला भेट दिली.संबंधित कास्तकारांना समक्ष उपस्थित ठेवून रस्त्याची शास्त्रोक्त आखणी करण्यात आली.महसूल यंत्रणेने केलेल्या या पारदर्शक कार्यवाहीमुळे कास्तकारांचे समाधान होऊन वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला क्षेत्ररक्षेचा वाद मिटला आणि रस्ता पुन्हा खुला करण्यात आला.
रस्ता खुला होताच कंत्राटदाराने उपलब्ध केलेल्या दोन जेसीबींच्या साह्याने सर्वांसमक्ष कामास सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी विभागाचे अभियंता, कंत्राटदार प्रतिनिधी तसेच एकलारा व पाटोदा या दोन्ही गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिखली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी आ.श्वेता महाले यांचा सक्रिय सहभाग नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे. रस्ता मंजुरीपासून ते प्रत्यक्ष कामाच्या प्रारंभापर्यंत येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर महसूल यंत्रणेशी समन्वय साधून तोडगा काढण्याची त्यांची कार्यपद्धती लोकप्रतिनिधित्वाचा खरा आदर्श ठरत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनींशी संबंधित संवेदनशील विषय संवाद आणि समन्वयाने निकाली काढण्यात आल्याने दोन्ही गावांतील जनतेने समाधान व्यक्त केले आणि आमदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली...
