चिखलीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४३व्या जयंतीनिमित्त भव्य अभिवादन...
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे केवळ एक नाव नाही, तर ती एक विचारधारा आहे, एक प्रेरणा आहे, एक जीवनदर्शन आहे. ज्या माणसाने अंदमानच्या काळकोठडीत अमानुष यातना सहन करताना देखील मातृभूमीवरील प्रेम आणि राष्ट्रभक्ती एक क्षणही ढळू दिली नाही, त्या थोर क्रांतिकारकाला आज चिखलीकरांनी मनोभावे अभिवादन केले.
त्यांनी या प्रसंगी सांगितले की, "स्वातंत्र्यवीर सावरकरांचे राष्ट्रनिष्ठ, त्यागमय आणि प्रेरणादायी जीवन प्रत्येक भारतीयासाठी ऊर्जेचा अखंड स्रोत आहे. त्यांनी देशासाठी केलेला त्याग, सहन केलेल्या यातना आणि राष्ट्रउभारणीसाठी मांडलेले विचार आजही तितकेच प्रासंगिक आणि मार्गदर्शक आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे."
आमदार श्वेता महाले यांनी यावेळी सावरकरांच्या जीवनातील संघर्षमय प्रवासाचे स्मरण करताना उपस्थित नागरिकांना राष्ट्रसेवेची प्रेरणा दिली. सावरकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या क्षेत्रात राष्ट्रउभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव झटत राहू आणि सावरकरांच्या राष्ट्रनिर्माणाच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मातृभूमीसाठी केलेला असीम त्याग, त्यांची अतुलनीय देशभक्ती आणि त्यांची क्रांतिकारी विचारधारा पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील. आमदार श्वेता महाले यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी सावरकरांच्या विचारांचा वसा घेऊन चिखली व बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी अविरत कार्य करण्याचा दृढ निश्चय या वेळी व्यक्त केला. या जयंती सोहळ्याने चिखलीकरांच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत अधिकच प्रज्वलित केली..
यावेळी मंचावर नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, भाजपा शहराध्यक्ष सागर पुरोहित, रामकृष्ण शेटे, असोलकर, रामदास देवडे, प्रेमराज भाला, रेणुकादास मुळे, कोथळकर, अश्विनी जाधव, सुभाष बारस्कर, शरद भाला,मंगेश व्यवहारे, मोहित व्यवहारे, संतोष काळे, विजय खरे, सिद्धेश्वर ठेंग, सुनील वायाळ, सुनील लाहोटी, श्याम वाकदकर, पवन लड्डा,राम बनसोडे, दीपक वाधवानी, बाळू जाधव, सुहास शेटे,जोगदंडे याशिवाय मतदारसंघातील लोकप्रतिनिधी,भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी,सावरकर समितीचे पदाधिकारी आणि चिखलीतील मोठ्या संख्येने उत्साही नागरिक या सोहळ्यास उपस्थित होते.
