हर्षवर्धन सपकाळ यांच्या अश्लील वक्तव्याविरोधात भाजपाचा तीव्र निषेध; उद्या जिल्हाभर निदर्शनांचे आयोजन

 

महेश गोंधणे-
चिखली:- नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे महाविकास आघाडीतर्फे आयोजित कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मोर्चाला संबोधित करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा एकेरी व अत्यंत आक्षेपार्ह, अश्लाघ्य शब्दांत उल्लेख केला. या बेताल व संस्कृतीहीन वक्तव्याचा चिखली विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या चौकात आयोजित निषेध कार्यक्रमात चिखली विधानसभेच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार श्वेता महाले पाटील म्हणाल्या की, सपकाळ यांनी केलेले वक्तव्य हे केवळ दोन व्यक्तींवरील टीका नसून संपूर्ण देशाच्या सन्मानावर केलेला आघात आहे. पंतप्रधानपद हे कोट्यवधी भारतीयांच्या आस्थेचे आणि लोकशाहीचे प्रतीक आहे. या पदाची गरिमा न राखता केलेले अशोभनीय वक्तव्य म्हणजे देशातील जनतेच्या भावनांचा थेट अपमान आहे. सपकाळ यांच्या या वक्तव्यातून काँग्रेस पक्षाची विकृत मानसिकता, संस्कृतीहीन राजकारण आणि सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची प्रवृत्ती पुन्हा एकदा जनतेसमोर उघडी पडली आहे. काँग्रेस पक्षाने या प्रकरणी तत्काळ जाहीर माफी मागावी आणि सपकाळ यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, महाविकास आघाडीला शेतकऱ्यांची खरोखरच काळजी असती तर सत्तेत असताना कांदा उत्पादकांसाठी ठोस धोरणे राबवली असती. मात्र सत्ता गेल्यानंतर केवळ राजकीय स्वार्थासाठी शेतकऱ्यांना हाताशी धरून असे संस्कृतीहीन राजकारण करणे हे दुटप्पीपणाचे लक्षण आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दि. २८ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता आपापल्या मंडळ स्तरावर स्थानिक काँग्रेस कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे आंदोलन केवळ निषेध नसून राष्ट्राचा सन्मान, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि जनतेच्या भावनांचे रक्षण करण्यासाठीचा बुलंद आवाज असेल, असे भाजपाने स्पष्ट केले आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने शिस्तबद्ध, प्रभावी व मोठ्या संख्येने उपस्थित राहून काँग्रेसच्या संस्कृतीहीन प्रवृत्तीचा धिक्कार करावा, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

भाजपा कार्यकर्त्यांनी निषेध कार्यक्रमात जोरदार घोषणाबाजी करत सपकाळ यांच्या वक्तव्याचा एकमुखाने धिक्कार केला...
Previous Post Next Post