चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून गुरुवारी (दि.२२ मे) रात्री उपनगराध्यक्ष सौ. वैशालीताई खेडेकर यांनी केलेल्या अचानक धडक तपासणीमुळे संपूर्ण आरोग्य प्रशासनात एकच खळबळ उडाली. रात्री सुमारे ११ वाजेच्या दरम्यान करण्यात आलेल्या या झाडाझडतीत रुग्णालयातील धक्कादायक आणि विदारक वास्तव समोर आले.
रुग्णालयात ड्युटीवरील डॉक्टर आणि नर्स सेविका अनुपस्थित असल्याने रुग्णांचे अक्षरशः हाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. आपत्कालीन परिस्थितीत उपचारासाठी आलेल्या रुग्णांना कोणतीही तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने संतप्त वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी शिवसेना नेते कपिल खेडेकर हे देखील उपस्थित होते. रुग्णांची होत असलेली परवड पाहून त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत, “सर्वसामान्य नागरिकांना मरणाच्या दारात सोडून आरोग्य यंत्रणा जबाबदारी झटकत आहे,” असा गंभीर आरोप केला.
तपासणीदरम्यान रुग्णालयातील प्रशासकीय गोंधळही समोर आला. वैद्यकीय अधिकारी उमर सैय्यद यांचा प्रभार उमेश सावजी यांच्याकडे, तर त्यांचा प्रभार नंदकिशोर जाधव यांच्याकडे असल्याचे सांगितले जात असताना संबंधित अधिकारीही रुग्णालयात उशिराने उपस्थित झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संपूर्ण रुग्णालयात सावळा गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र होते.
रुग्णालयाची अवस्था केवळ सलाईनपुरती मर्यादित झाली असून “आज हॉस्पिटलचं ऑपरेशन शिवसैनिकांनीच केलं,” अशी संतप्त भावना उपस्थित नागरिक आणि शिवसैनिकांनी व्यक्त केली.
अचानक झालेल्या तपासणीमुळे उपस्थित कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. यावेळी उपनगराध्यक्ष वैशालीताई खेडेकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. तसेच गैरहजर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या घटनेमुळे चिखली उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेचा बोजवारा पुन्हा एकदा उघड झाला असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
