चिखली येथे डिझेल-पेट्रोल टंचाईवर आमदार श्वेता महाले यांची संयुक्त बैठक संपन्न...
चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.श्वेता महाले यांनी आज तहसील कार्यालय चिखली येथे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या डिझेल-पेट्रोल टंचाईच्या समस्येवर महसूल विभाग, पुरवठा विभाग, पोलीस यंत्रणा आणि पेट्रोल पंप चालक यांची संयुक्त बैठक घेतली.
यावेळी बोलताना आ. श्वेता महाले म्हणाल्या की, "ही केवळ एका जिल्ह्याची, राज्याची किंवा देशाची समस्या नसून हे एक जागतिक संकट आहे. भारत या संकटाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. मात्र राजकीय फायद्यासाठी काही लोक जाणूनबुजून अफवा पसरवत आहेत." अशा अफवा पसरवणाऱ्यांवर पोलीस खात्याने कठोर कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
अफवांमुळे गरज नसतानाही नागरिक जास्तीचा साठा करतात, परिणामी कृत्रिम टंचाई निर्माण होते. त्याचाच फायदा घेऊन काही साठेबाज अधिक दराने पेट्रोल-डिझेलची विक्री करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे आमदारांनी सांगितले. या परिस्थितीमुळे सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना बसत असून शेतीच्या कामांसाठी त्यांना वेळेवर इंधन मिळत नसल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे या अफवांचा परिणाम इतका गंभीर झाला आहे की शासकीय वाहने, नगर परिषदेच्या घंटागाड्या आणि रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) यांनाही पेट्रोल पंपावर रांगेत उभे राहावे लागत आहे. यावर प्रशासकीय यंत्रणांनी त्वरित कारवाई करून साठेबाजांना चाप लावावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आ.श्वेता महाले यांनी ठणकावून सांगितले.
पेट्रोल पंप धारकांनाही त्यांनी आवाहन केले की साठेबाजांना इंधन पुरवण्याऐवजी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्याने पेट्रोल-डिझेल उपलब्ध करून द्यावे. पुरवठा विभाग व शासकीय अधिकाऱ्यांनाही पेट्रोल पंप धारकांना योग्य संरक्षण व सुविधा पुरवाव्यात, जेणेकरून ते देशाची व शेतकऱ्यांची सेवा अखंडितपणे करू शकतील, असे निर्देश त्यांनी दिले.
पेट्रोल पंप धारकांनीही आमदारांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, भूतकाळात झालेल्या चुका सुधारून यापुढे शेतकरी व सर्वसामान्यांना इंधन योग्य प्रकारे मिळेल याची खात्री देण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीस नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, डॉ. कृष्णकुमार सपकाळ, अमोल साठे, सागर पुरोहित,गजानन मोरे, रामदास देव्हडे, दीपक खरात, दीपक वाधवाणी, संजय गाडेकर, संतोष काळे पाटील, यांच्यासह जिल्हा पुरवठा अधिकारी, प्रभारी तहसीलदार गावंडे आणि पोलीस निरीक्षक भूषण गावंडे उपस्थित होते..
