महेश गोंधणे-
(चिखली) जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगून मोठ्या घातपाताच्या किंवा गुन्हेगारीच्या तयारीत असलेल्या आंतरजिल्हा टोळीचा पोलिसांनी थरारक पाठलाग करून पर्दाफाश केला आहे. तालुक्यातील अंत्रीकोळी परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी दोन देशी बनावटीची अत्याधुनिक पिस्तुल, चार मॅगझीन आणि तब्बल ९२ जिवंत काडतुसांचा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी जालना, जळगाव आणि वर्धा कनेक्शन असलेल्या तीन सराईत आरोपींना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून आलिशान एक्सयूव्ही कार आणि आयफोनसह ७ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मोठ्या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ मे रोजी अंत्रीकोळी गावात काही संशयास्पद तरुण घातक आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रांसह वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनी तात्काळ चक्र फिरवून विशेष पथकाला ‘अॅक्शन मोड’वर आणले. पोलिसांच्या संयुक्त पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास अंत्रीकोळी परिसरात पंचांसमक्ष घेराबंदी करून आर्म ॲक्टनुसार थेट ‘रेड’ टाकली. पोलिसांचा छापा पडताच पळण्याच्या तयारीत असलेल्या तीनही आरोपींना पोलिसांनी जागीच जेरबंद केले.
अटक केलेले आरोपींची नावे -शुभम सागर पवार (रा. कारला चौक, वर्धा),रुपेश मिलन शिंदे (रा. हसनाबाद, ता. भोकरदन, जि. जालना; सध्या रा. पाचोरा, जि. जळगाव),रोहेल मिलन शिंदे (रा. हसनाबाद, ता. भोकरदन, जि. जालना; सध्या रा. पाचोरा, जि. जळगाव)
पोलिसांनी आरोपींची कसून झडती घेतली असता, त्यांच्याकडून गुन्हेगारीसाठी वापरण्यात येणारे मोठे साहित्य जप्त करण्यात आले असून या मध्ये ,२ देशी बनावटीची पिस्तुल (पिस्टल) आणि ४ मॅगझीन, ९२ जिवंत काडतुसे आणि २ वापरलेली काडतुसे, १ धारदार लोखंडी चाकू, महिंद्रा कंपनीची XUV500 कार (क्रमांक MH 20 DJ 8687) सोबत आयफोन १६ प्रो मॅक्स’ मोबाईल फोन असा पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे आणण्यामागे या टोळीचा नेमका काय मनसुबा होता? याचा तपास आता पोलीस करत आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनंत कळमकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रायपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ९२/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम (कलम ३, ५, ७, २५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम १३५(३) नुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई नागपूर (ATS व )अकोला दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) संयुक्तपणे अत्यंत गुप्तता पाळून यशस्वी केली. रायपूर ठाणेदार निलेश सोळंके ,पोलीस हेडकॉन्स्टेबल दशरथ शितोळे, ज्योती गलबले, पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव, अनंत कळमकर, अख्तर शेख, लक्ष्मण शिंदे, चालक पोलीस हवालदार सागर कोरडे यांनी गुप्तता पाळून यशस्वी केली. या आंतरजिल्हा शस्त्रास्त्र तस्करीच्या मागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात असून, पुढील तपास ठाणेदार निलेश सोळंके आणि पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंदे करत आहेत.

