आ.श्वेता महाले यांच्या हस्ते शेलसूरमध्ये सभागृहाचे लोकार्पण..

 "शेतकरी वारकऱ्यांच्या गावात विकासाची पंढरी,


महेश गोंधणे-

चिखली विधानसभा मतदारसंघातील शेलसूर या गावामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर बांधण्यात आलेल्या सभागृहाचे आज आ.श्वेता महाले यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले. या शुभप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ, वारकरी व शेतकरी बांधवांना संबोधित करताना आमदार महाले  यांनी विकासकामांचा आढावा सादर केला आणि पांडुरंगाच्या भक्तीला विकासकार्याची जोड देणारे भावपूर्ण विचार मांडताना

 म्हणाल्या की,"आजपर्यंत ज्या शेतरस्त्यांना सरकारी नकाशावर स्थान नव्हते, ते रस्ते आता नकाशावर आणण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे." शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी वर्षानुवर्षे ज्या अडचणींचा सामना करावा लागत होता, त्या दूर करण्यासाठी शासन ठोस पाऊले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्याचवेळी त्यांनी स्पष्ट केले की, "शेतकऱ्यांच्या सहकार्याशिवाय शेतरस्ते होणार नाहीत. जोपर्यंत गावातील शेतकरी बांधव एकत्र येऊन सहकार्य करणार नाहीत, तोपर्यंत हे काम पूर्णत्वास नेणे शक्य नाही." या शब्दांनी उपस्थित शेतकऱ्यांनी मनापासून दाद दिली.


विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील या सभागृहाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने बोलताना आमदारांनी पांडुरंगाच्या महतीवर विशेष भाष्य केले. "वारकरी परंपरेतील पांडुरंग हा केवळ देव नाही, तो शेतकऱ्यांचा आत्मा आहे, सामान्य माणसाचा आधार आहे," असे त्यांनी सांगितले. धर्म आणि धर्माचा आदर हे समाजजीवनाचे अविभाज्य अंग असल्याचे त्यांनी अधोरेखित करताना भक्ती आणि विकास यांची सांगड घालणे हेच महायुती सरकारचे ध्येय असल्याचे नमूद केले.

महायुती सरकारचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करताना आमदार श्वेता महाले यांनी सांगितले की, "मुख्यमंत्र्यांची सामान्य जनतेशी असलेली नाळ हे महायुतीचे सर्वात मोठे बळ आहे. ते केवळ नेते नाहीत, ते जनतेच्या भावनांशी जोडलेले आहेत." या सरकारमध्ये धर्म, विकास आणि शेतकरी कल्याण या तीन गोष्टी एकाच सूत्रात गुंफलेल्या आहेत,असे त्यांनी ठामपणे सांगितले.

या कार्यक्रमास देशोन्नती दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे हे देखील उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात आमदार श्वेता महाले यांच्या कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले. ते म्हणाले की, शेलसूर हे गाव काही वर्षांपूर्वी शंभर टक्के काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. परंतु आमदार महाले यांनी विकासाचे राजकारण करताना समाजातील सर्व स्तरांशी सलोख्याची वागणूक ठेवल्यामुळे हे चित्र आमूलाग्र बदलले आहे .परिणामी एकेकाळी संपूर्ण काँग्रेसमय असलेले शेलसूर आज भाजपमय झाले आहे असे  काळे यांनी अधोरेखित केले.गावातील अनेक पिढ्या काँग्रेससाठी खर्ची पडल्या, मात्र प्रत्यक्ष विकास आ.श्वेता महाले  यांच्याच कार्यकाळात पाहायला मिळाला, असे गावकऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे नमूद केले. 

या कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, वारकरी मंडळाचे प्रतिनिधी, स्थानिक शेतकरी बांधव व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभागृहाचया लोकार्पणानंतर विठ्ठल रुक्मिणीचा जयघोष करण्यात आला आणि वातावरण भक्तिमय बनले...

या सोहळ्यास माजी पंचायत समिती सभापती अरविंद देशमुख,देशोन्नती जिल्हा प्र.राजेंद्र काळे,गजानन पोफळे सहायक गट विकास अधिकारी दिनकर काळे,संजय रिंढे,रामदास रिंढे, पुरुषोत्तम धुंदळे, दिलीप मामा काळे, नरेंद्र कापसे, दिलीप रिंढे, एल. के. वरपे , वसंतराव कापसे, मनोहर रिंढे, निर्मलाताई रिंढे, सरस्वती रिंढे, पुष्पाताई काळे,भगवान धारणकर, आदींसह मोठ्या संख्येने गावकरी बंधू-भगिनी उपस्थित होते.

Previous Post Next Post