महेश गोंधणे-
चिखली विधानसभा मतदारसंघातील किन्ही सवडद गावातील चार शेत रस्ते मागील वीस वर्षांपासून बंद असल्यामुळे येथील शेतकऱ्यांना अत्यंत गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत होते. स्वतःच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी कित्येक किलोमीटरचा वळसा घ्यावा लागत होता, ट्रॅक्टर व शेती अवजारे शेतापर्यंत नेता येत नव्हती, पेरणी व काढणीच्या हंगामात यंत्रे वेळेत पोहोचत नसल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत होते, शेतमाल बाजारात वेळेत न पोहोचल्याने तो शेतातच खराब होत होता, तसेच जादा मजुरीचा भुर्दंडही शेतकऱ्यांना सोसावा लागत होता. वीस वर्षे वेगवेगळ्या यंत्रणांकडे तक्रारी करूनही या शेतकऱ्यांची समस्या सुटली नव्हती.
अखेर किन्ही सवडच्या शेतकऱ्यांनी आमदार श्वेता महाले यांच्याकडे आपली व्यथा मांडली असता त्यांनी तातडीने दखल घेत चिखली तहसील कार्यालयाशी समन्वय साधला. त्यांच्या निर्देशानुसार नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांनी प्रत्यक्ष गावात भेट देऊन चारही शेत रस्ते मोकळे केले.
वीस वर्षांत जे शक्य झाले नव्हते,ते आमदारांच्या हस्तक्षेपाने अल्पावधीत पूर्ण झाले.
रस्ते मोकळे झाल्यानंतर गावातील शेतकऱ्यांनी आमदार श्वेता महाले पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले. "आम्ही वर्षानुवर्षे दाद मागत होतो,पण न्याय मिळत नव्हता. आमदार ताईंनी आमची समस्या समजून घेतली आणि त्वरित कारवाई केली,"असे शेतकऱ्यांनी सांगितले. चिखली मतदारसंघातील शेतकरी व गोरगरीब जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार श्वेता महाले सातत्याने कार्यरत असल्याचे यावरून सिद्ध होते.
