रुग्णांच्या हक्कांचे उल्लंघन आणि आर्थिक लुबाडणुकीची चौकशीची मागणी
चिखली(महेश गोंधणे) :-बुलढाणा जिल्ह्यातील खाजगी डॉक्टर आणि हॉस्पिटल्सकडून रुग्णांच्या हक्कांचे उल्लंघन, आर्थिक लुबाडणूक तसेच वैद्यकीय नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते सुनील धंदर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक बुलडाणा यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे. या संदर्भात सर्व खाजगी रुग्णालयांची तातडीने तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नॅशनल मेडिकल कमिशनच्या स्पष्ट नियमांनुसार डॉक्टरांनी रुग्णांना औषधांचे जेनेरिक नाव इंग्रजीतील मोठ्या अक्षरांमध्ये लिहून देणे बंधनकारक आहे. कंपनीचे नाव केवळ अत्यावश्यक असेल तरच कंसात लिहिता येते. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील अनेक डॉक्टर हा नियम पाळत नसून थेट विशिष्ट ब्रँडची महागडी औषधे लिहित आहेत. एवढेच नव्हे तर ती औषधे त्यांच्याच हॉस्पिटलमधील किंवा विशिष्ट मेडिकलमधूनच घेण्याची सक्ती केली जाते आणि ती त्यांच्याच मेडिकल मध्ये मिळतात.बाजारात कमी दरात उपलब्ध असणारी जेनेरिक औषधे टाळून ब्रँडच्या नावाखाली जास्त एमआरपी असलेली औषधे विकून रुग्णांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट आणि ग्राहक हक्क संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक क्लिनिक आणि हॉस्पिटलने तपासणी फी, बेड चार्जेस, आयसीयू चार्जेस आणि इतर उपचारांचे दरपत्रक रुग्णांना सहज दिसेल अशा ठिकाणी मराठी आणि इंग्रजीत लावणे आवश्यक आहे. परंतु जिल्ह्यातील बहुतांश हॉस्पिटल्समध्ये असे कोणतेही दरपत्रक लावले जात नाही, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
कायद्यानुसार समान शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेल्या डॉक्टरांच्या तपासणी फी आणि उपचार खर्चात मोठा फरक असता कामा नये. मात्र जिल्ह्यात समान पदवी असलेले डॉक्टर मनमानी पद्धतीने वेगवेगळी रक्कम वसूल करत आहेत. तसेच रुग्णांना उपचारानंतर तपशीलवार बिलही दिले जात नाही. ही एक प्रकारची अवाजवी व्यापारी पद्धत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
इमर्जन्सीच्या बाबतीतही गंभीर प्रकार समोर आले आहेत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने परमानंद कटारा खटल्यात दिलेल्या आदेशानुसार कोणत्याही अपघातात किंवा गंभीर परिस्थितीत रुग्णावर तातडीने प्रथमोपचार करणे हे प्रत्येक डॉक्टरचे कर्तव्य आहे. पैसे किंवा कागदपत्रांअभावी उपचार नाकारणे हा गुन्हा आहे. असे असतानाही अनेक खाजगी हॉस्पिटल्स आधी डिपॉझिट किंवा पैशांची मागणी करतात आणि पैसे नसल्यास गंभीर रुग्णालाही दुसरीकडे पाठवून देतात. त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या सर्व प्रकारांची दखल घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील सर्व खाजगी हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्सची आपल्या स्तरावरून कडक तपासणी करण्यात यावी आणि रुग्णांचे हक्क पायदळी तुडवणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित डॉक्टर आणि हॉस्पिटल्सवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच लेखी निर्देश सर्व डॉक्टराना द्यावे, अशी विनंती धंदर यांनी केली आहे.या निवेदनाची प्रत अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांनाही पाठवण्यात आली आहे.
