उल्लेखनीय कामगिरी बद्दल ठाणेदार यांचा सन्मान
चिखली(महेश गोंधणे):- पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी विविध सेवा पदकांनी गौरविण्यात येते. याच पार्श्वभूमीवर, बुलढाणा शहर पोलीस ठाणेदार संग्राम पाटील यांना त्यांच्या पोलीस दलातील उत्कृष्ट आणि धडाकेबाज कामगिरीबद्दल 'उत्कृष्ट सेवा पदक' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
ठाणेदार संग्राम पाटील यांनी बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावताना अनेक आव्हानात्मक गुन्ह्यांचा यशस्वीरीत्या छडा लावला आहे. साखरखेर्डा ,धाड आणि विशेषतः चिखली पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना त्यांनी केलेल्या प्रभावी कारवाईमुळे गुन्हेगारांवर कायद्याचा मोठा धाक निर्माण झाला होता. शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यात आणि गुन्हेगारीला वेसण घालण्यात त्यांनी नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या याच अखंड सेवेची दखल घेऊन प्रशासनाकडून त्यांना हे सन्मान पदक १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० व्या स्वातंत्र्यदिनी जाहीर करण्यात आले.स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते ठाणेदार संग्राम पाटील यांना हे उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करून गौरविण्यात आले.
या विशेष गौरव सोहळ्याला बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आ. संजय गायकवाड, सिंदखेडराजा मतदारसंघाचे आ.मनोज कायंदे, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी प्रविण देवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी शरद पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संग्राम पाटील यांना मिळालेल्या या बहुमानाबद्दल पोलीस दलासह सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
