महेश गोंधणे-
परमहंस मौनीबाबा शैक्षणिक संस्थेमधील अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि इतर संबंधितांवर तातडीने कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी चिखलीतील शेकडो नागरिकांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल बोंद्रे संचालित शैक्षणिक संस्थांबाबत विविध गंभीर स्वरूपाचे आरोप समोर आले असून संबंधित प्रकरणांमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, गुन्हे दाखल होऊनही अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
निवेदनात म्हटले आहे की, राहुल बोंद्रे व संबंधित संस्थांविरुद्धच्या सर्व आरोपांची स्वतंत्र, निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करण्यात यावी. तसेच प्रकरणांची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून प्रमुख आरोपी राहुल बोंद्रे यांच्यासह इतर आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.
आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आरोपींवर त्वरित कारवाईची मागणी केली. "राहुल बोंद्रे यांना तात्काळ अटक करा" अशा घोषणा देत नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. निवेदनावर चिखली परिसरातील शेकडो नागरिकांच्या सह्या करण्यात आल्या होत्या.
नागरिकांनी प्रशासनाकडे असा मुद्दाही उपस्थित केला की, प्रमुख आरोपी समाजमाध्यमांवर सातत्याने सक्रिय असूनही त्यांच्यावर अटकेची कारवाई झालेली नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी एक न्याय आणि प्रभावशाली आरोपींसाठी दुसरा न्याय असा चुकीचा संदेश समाजात जात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. तसेच आरोपी बाहेर राहिल्यास पुरावे नष्ट होण्याची किंवा साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
याशिवाय शिक्षकांचे प्रलंबित वेतन, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व इतर शैक्षणिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. चौकशी पूर्ण होईपर्यंत संस्थेतील सर्व आर्थिक व्यवहार, शासकीय अनुदाने व निधीची विशेष लेखापरीक्षा (ऑडिट) करण्यात यावी तसेच संस्थेशी संबंधित लेखा पुस्तके, हार्ड डिस्क आणि महत्त्वाची कागदपत्रे शासनाच्या ताब्यात घेण्यात यावीत, अशीही मागणी करण्यात आली.
दरम्यान, राहुल बोंद्रे यांनी अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेली अंतरिम याचिका न्यायालयाने फेटाळल्याची माहिती आज समोर आल्याने लवकरच राहुल बोन्द्रे यांना अटक केली जाईल अशी भावना जनतेमध्ये अधिक तीव्र झाल्याचे दिसून आले.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केल्यानंतर प्रतिनिधी मंडळाशी चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित बाबींची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आश्वस्त केल्याचे आंदोलकांनी सांगितले.
हजारो विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या भविष्याशी निगडित असलेल्या या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली...



