जनता दरबारातील तक्रारींच्या निवारणाचा आमदार श्वेता महाले यांनी घेतला आढावा; अनेक समस्या जागेवरच मार्गी

 चिखली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या प्रभावी निवारणासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या जनता दरबारातील प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी आमदार सौ.श्वेता महाले यांनी आज विशेष आढावा बैठक घेतली. विशेष म्हणजे या आढावा बैठकीलाही जनता दरबाराचेच स्वरूप प्राप्त झाले.मोठ्या संख्येने शेतकरी, नागरिक आणि तक्रारदार उपस्थित राहिले होते.

जनता दरबारात प्राप्त झालेल्या तक्रारींची सद्यस्थिती, त्यावरील कार्यवाही आणि प्रलंबित प्रकरणे यांचा सविस्तर आढावा आमदार श्वेता महाले  यांनी घेतला. यावेळी गावागावांतून आलेल्या शेतकऱ्यांच्या तसेच विविध समस्यांनी ग्रस्त नागरिकांच्या तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या. तक्रारदार आणि अधिकारी यांच्यात योग्य समन्वय साधून अनेक प्रश्न तत्काळ सोडविण्यावर भर देण्यात आला.

बैठकीस तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, महसूल विभागातील तलाठी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. महसूल, ग्रामविकास, नगरपरिषद व इतर विभागांशी संबंधित अनेक तक्रारींवर यावेळी चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना आमदार श्वेता महाले  यांनी दिल्या.

काही तक्रारींचे निवारण बैठकीदरम्यानच करण्यात आले, तर उर्वरित प्रकरणांबाबत निश्चित कालमर्यादेत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार महाले यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे कौतुक केले.

यावेळी बोलताना आ. श्वेता महाले म्हणाल्या की, "जनता दरबार हा केवळ तक्रारी स्वीकारण्याचा उपक्रम नसून प्रत्येक तक्रारीचा पाठपुरावा करून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे प्रभावी माध्यम आहे. लोकांच्या समस्या वेळेत सुटल्या पाहिजेत, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय आवश्यक आहे.

चिखली विधानसभा मतदारसंघात नियमितपणे आयोजित करण्यात येणाऱ्या जनता दरबारामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट लोकप्रतिनिधी आणि प्रशासनापर्यंत मांडण्याची संधी मिळत असून त्यातून अनेक प्रश्नांना तातडीने न्याय मिळत आहे.आजची आढावा बैठक ही जनता दरबाराच्या प्रभावी अंमलबजावणीचे आणि लोकांच्या तक्रारींवर होत असलेल्या ठोस कार्यवाहीचे उत्तम उदाहरण ठरली.


Previous Post Next Post