पंचवीस वर्षांची प्रतीक्षा संपली; नायगाव खुर्दमध्ये पुन्हा धावली एसटी..

 श्वेताताईंच्या विकासदृष्टीचा आणखी एक ठसा...


चिखली : चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे आणि विकासाभिमुख नेतृत्वामुळे नायगाव खुर्द या गावाला तब्बल २५ वर्षांनंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे. या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी आमदार सौ.महाले यांचे आभार व्यक्त केले आहेत.

सुमारे एक हजार लोकसंख्या असलेल्या नायगाव खुर्द गावात गेल्या २५ वर्षांपासून एसटी बस सेवा बंद होती. त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. गावकऱ्यांनी ही समस्या सरपंच सौ.गंगाताई नंदकिशोर गुंजकर यांच्या माध्यमातून आमदार श्वेता महाले यांच्यापर्यंत पोहोचविली. त्यानंतर आमदार महाले यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावला.

आ. श्वेता महाले यांनी मतदारसंघातील दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नायगाव खुर्द येथे एसटी सेवा पुन्हा सुरू करण्याचा प्रश्न त्यांनी गांभीर्याने घेतला आणि प्रशासनाशी समन्वय साधून सकारात्मक निर्णय मिळवून दिला.

चिखली–लव्हाळा मार्गे नायगाव खुर्द येथे एसटी बस प्रथमच दाखल होताच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले. बसचे विधिवत पूजन करण्यात आले तसेच चालक, वाहक आणि आगारातील अधिकारी संतोष ढोणे यांचा शाल, श्रीफळ, रुमाल व टोपी देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी आ. श्वेता महाले यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीचे कौतुक करत त्यांच्या प्रयत्नांमुळे गावाला मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली.

गावागावातील मूलभूत सुविधांसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आमदार श्वेता महाले यांच्या पाठपुराव्यामुळे नायगाव खुर्दच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून, २५ वर्षांनंतर पुन्हा सुरू झालेली एसटी सेवा ग्रामस्थांसाठी विकासाची नवी दिशा ठरणार आहे.

Previous Post Next Post