चिखली शहर अतिक्रमणाच्या विळख्यात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त ...


चिखली :-चिखली शहरात बेकायदेशीर अतिक्रमणाने कळस गाठला असून नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संपूर्ण शहर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, नाल्या व शासकीय जागांवर उघडपणे अतिक्रमण सुरू असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप इंडियन रेड क्रॉस सोसायटी, बुलढाणाचे संचालक सुनिल धंदर यांनी केला आहे.
शहरातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण, स्वच्छतेचा बोजवारा आणि आपत्कालीन सेवांना होणारा अडथळा ही गंभीर समस्या बनली आहे. वारंवार तक्रारी व निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी अतिक्रमणधारकांना पाठीशी घालत असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
नगरपरिषदेच्या मालकीच्या जागांवर बिनधास्तपणे अतिक्रमण सुरू असून नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहेत का, असा थेट सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. काही व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर अर्ध्या रस्त्यापर्यंत वाहने उभी राहत असून त्यांना अभय दिले जात असल्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.
इंडियन रेड क्रॉस सोसायटी बुलढाणाच्या वतीने स्पष्ट शब्दांत इशारा देण्यात आला आहे की,
बेकायदेशीर अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे,
अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावेत,
दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, तसेच शासकीय व निमशासकीय कर्मचारी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे शिस्तभंग कारवाई प्रस्तावित करावी. शहरातील सर्वच अतिक्रमण धारकांचे वीज पुरवठा आणि नळ पुरवठा तत्काळ तात्पुरता बंद करण्यात यावा.
व्यापारी अतिक्रमण धारकांचे ट्रेड परवाने व शॉप अ‍ॅक्ट रद्द करण्यात यावेत.
जर प्रशासनाने तात्काळ ठोस कारवाई केली नाही, तर इंडियन रेड क्रॉस सोसायटी बुलढाणा जनहित याचिका न्यायालयात दाखल करेल असा स्पष्ट इशारा सुनिल धंदर यांनी दिला आहे.शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी व सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्यांना आता पाठीशी घालणे थांबवा, अन्यथा जनआक्रोशाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
Previous Post Next Post