शेत/पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून शेतकऱ्यांचा प्रगतीमार्ग मोकळा करावा...आ.श्वेता महाले


चिखली: शेतकरी बांधवांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या शेत/पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून त्यांचा प्रगतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ.श्वेता महालेंच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय चिखली येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांना थेट, बारमाही दळणवळण मिळावे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.
या बैठकीत मतदारसंघातील सुरू असलेल्या व प्रस्तावित शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अनेक ठिकाणी अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले असून काही ठिकाणी पूर्णपणे बंद झाल्याने शेतकऱ्यांना शेतीकामासाठी मोठ्या अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करून रस्ते मोकळे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आ.श्वेता महाले यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाला प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमणाची अचूक नोंद घ्यावी, संबंधितांना नोटीस बजावावी तसेच ग्रामपंचायत व स्थानिक यंत्रणांच्या माध्यमातून जनजागृती करून स्वेच्छेने अतिक्रमण काढण्याचे आवाहन करावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. आवश्यक ठिकाणी कायदेशीर कारवाई करून रस्ते खुल्या करून देण्यावर भर देण्यात आला.
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत होणारी सर्व कामे पारदर्शक पद्धतीने, योग्य निधी वापर करून व दर्जेदाररीत्या वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही निर्देश यावेळी देण्यात आले. या रस्त्यांमुळे शेतीमालाची वाहतूक सुलभ होऊन शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास आ.महाले यांनी व्यक्त केला.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार व विजय सवडे, गटविकास अधिकारी समाधान वाघ, श्रीमती पवार  यांच्यासह महसूल,पंचायत व संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

Previous Post Next Post