बाण नदीवरील पुलाच्या लोकार्पणाने धाड–धामनगावचा प्रवास झाला सुकर..


आ.श्वेता महाले यांच्या पुढाकारातून 6.75 कोटींचा विकास प्रकल्प पूर्ण...
(महेश गोंधणे):-चिखली विधानसभा मतदारसंघातील मौजे धाड येथे बाण नदीवर उभारण्यात आलेल्या धाड–धामनगाव रस्त्यावरील भव्य पुलाचे आज लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. सुमारे ६ कोटी ७५ लाख रुपये खर्चून साकारलेला हा रुंद व मजबूत पूल कार्यान्वित झाल्यामुळे अनेक वर्षांपासून ग्रामस्थांना भेडसावणारी वाहतुकीची गंभीर समस्या अखेर सुटली आहे.
या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधेच्या उभारणीत आ.श्वेता महाले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा मोठा वाटा असून, चिखली विधानसभा मतदारसंघात रस्ते, पूल व दळणवळण सुविधा सक्षम करण्याच्या त्यांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनाचे हे ठळक उदाहरण ठरत आहे. 
पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुरामुळे होणारा संपर्क तुटवडा आणि शेतमाल वाहतुकीचा अडथळा आता या पुलामुळे कायमचा दूर होणार आहे.
ग्रामस्थांनी हा पूल म्हणजे केवळ दळणवळणाचा मार्ग नसून, आपल्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा नवा दुवा असल्याची भावना व्यक्त केली.याच धर्तीवर धाड परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमही राबवले जात असून, सुमारे ११ कोटी रुपयांहून अधिक निधीतून रस्ते, सभामंडप, सांडपाणी व्यवस्था, शेतरस्ते, शाळा सुविधा आदी प्रकल्प मार्गी लागत आहेत. 
आ.श्वेता महाले यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावातील मूलभूत सुविधा मजबूत होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.बाण नदीवरील हा नवा पूल केवळ दोन गावांना जोडणारा नाही, तर संपूर्ण परिसराच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारा ठरणार असून, चिखली मतदारसंघात विकासाची गती आणखी वेगाने पुढे नेण्याचा आ.श्वेता महाले यांचा संकल्प या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
या लोकार्पण सोहळ्याला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच धाड व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते....
Previous Post Next Post