सिंदखेड राजा येथे आ.श्वेता महाले यांनी घेतले माँ जिजाऊचे दर्शन...


चिखली(महेश गोंधणे):-मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे स्वराज्यजननी, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या ४२८व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य जन्मोत्सव सोहळ्यात चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आ.सौ.श्वेता महाले यांनी उपस्थित राहून जिजाऊ माँसाहेबांच्या चरणी नतमस्तक होत भावपूर्ण अभिवादन केले. 
                 मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण देशासाठी स्वराज्य, संस्कार आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.जिजाऊ माँसाहेब केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर त्या एक कुशल प्रशासिका, आदर्श माता आणि राष्ट्रनिर्मितीची संकल्पना रुजवणाऱ्या महान विचारवंत होत्या. त्यांनी दिलेले संस्कार, शिस्त आणि राष्ट्रभक्तीची शिकवण आजही प्रत्येक पिढीसाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरत असल्याचे आ.श्वेता महाले यांनी सांगितले.
या पवित्र भूमीत उभे राहून जिजाऊ माँसाहेबांच्या स्मृतींना वंदन करताना स्वराज्याच्या उभारणीमागील त्याग, दूरदृष्टी आणि मातृत्वाची महानता प्रकर्षाने जाणवते, असेही त्यांनी यावेळी व्यक्त केले. जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांतून आजच्या तरुण पिढीने राष्ट्रसेवा, कर्तव्य आणि चारित्र्य या मूल्यांचा अंगीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रप्रेम जागवणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.या सर्व उपक्रमांना आ.श्वेता महाले यांनी भेट देत आयोजकांचे अभिनंदन केले व मातृतीर्थाच्या विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली.
राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे जीवन आणि कार्य हे आजच्या महिला सक्षमीकरणासाठीही प्रेरणादायी आहे. स्त्रीशक्ती, नेतृत्व आणि राष्ट्रभक्ती यांचा संगम जिजाऊ माँसाहेबांच्या जीवनात दिसून येतो, असे सांगत आ.श्वेता महाले यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.
या वेळी राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर, चिखलीचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख,डॉ.गणेश मांटे,भाजपा शहराध्यक्ष सागर पुरोहित आदी मान्यवरांनीही माँसाहेबांना अभिवादन केले...

Previous Post Next Post