राहुल बोंद्रे यांच्या आदेशावरून निषेध आंदोलन करणे पडले महाग! महिलांवर झाला गुन्हा दाखल...
चिखली शहरातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी गरीब व बहुजन समाजातील महिलांना आंदोलनाच्या नावाखाली 'ढाल' म्हणून वापरल्याचे उघड होत असून, या प्रकरणी चिखली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेवरून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे(कवाडे गट )जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई यांनी राहुल बोंद्रे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेला 'कुंकू-मंगळसूत्र' वाद आता अधिक तीव्र झाला असून, आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
उपलब्ध पोलीस तक्रार व दस्तऐवजानुसार, ५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० ते ३.०० वाजण्याच्या दरम्यान चिखली शहरात निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान काही महिलांनी विनापरवानगी जमाव जमवून सार्वजनिक शांतता भंग होईल असे कृत्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी चिखली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम १४३, १४७, १८८, २८३ व १३५ (महाराष्ट्र पोलीस कायदा) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, बेकायदेशीर जमाव, शासकीय आदेशाचे उल्लंघन आणि सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणे असे आरोप आहेत.
दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत राहुल बोंद्रे यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या म्हणण्यानुसार, "राहुल बोंद्रे हे नेहमीच गरीब व बहुजन समाजातील लोकांचा आपल्या राजकारणासाठी वापर करतात. या आंदोलनात ज्यांना पुढे केले गेले त्या महिलांचा काँग्रेसशी कुठलाही थेट संबंध नाही."
ते पुढे म्हणाले, "या आंदोलनात बोंद्रे कुटुंबातील एकही महिला का सहभागी झाली नाही, याचे उत्तर राहुल बोंद्रे यांनी द्यावे. म्हणजे खेळ पैठणीचा खेळायचा असेल आणि हळदी कुंकवाचे कार्यक्रम करायचे असतील तर बोंद्रे घराण्यातील स्त्रिया आणि येथे मात्र अतिशय गरीब व आमच्या बहुजन समाजातील महिलांना पुढे करून आंदोलन करण्यात आले आणि आता त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे बहुजन समाजाने अशा कुटील राजकारणाला बळी पडू नये."
या घटनेमुळे चिखलीतील राजकीय वातावरण आणखी तापले असून, एका वक्तव्यावरून सुरू झालेला वाद आता थेट पोलिस कारवाईपर्यंत पोहोचला आहे.
या प्रकरणात नामनिर्देशित आरोपी महिलांमध्ये — (१) प्रेमलताबाई जाधव, गजाननगर, चिखली; (२) शालिनीबाई वानखडे, रा. पुंडलिकनगर, चिखली; (३) मंदाताबाई काकडे, रा. सिद्धार्थनगर, चिखली; (४) विद्या देशमाने, रा. आदर्शसेलजवळ, चिखली — या महिलांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त आणखी ५ ते १५ अज्ञात महिला देखील या आंदोलनात सहभागी असल्याची नोंद आहे.
विजय गवई पुढे म्हणाले की, हे काही आजचे नाही स्वातंत्र्यापासूनच काँग्रेसने बहुजन, दलित व गरीब समाजाचा केवळ मतपेटीसाठी वापर केला आहे. सत्तेत असताना या समाजाच्या खऱ्या विकासाकडे डोळेझाक केली, मात्र आंदोलन, निषेध आणि रस्त्यावरची लढाई करताना याच समाजाच्या पाठीमागे दडून राहण्याचे काँग्रेसचे षड्यंत्र आजही कायम आहे.
राहुल बोंद्रे हे काँग्रेसच्या याच परंपरेचे वारस आहेत. गरीब व बहुजन महिलांना आंदोलनात उतरवायचे, त्यांच्यावर पोलीस केस होऊ द्यायची आणि स्वतः मात्र सुरक्षित राहायचे — हे धोरण बहुजन समाजाने आता ओळखले पाहिजे, असेही विजय गवई यांनी ठणकावले....
