खंडाळा मकरध्वज ग्रामपंचायतीत सत्तानाट्याला पूर्णविराम!

 सरपंच उज्वला जाधव यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर; ८ सदस्यांचा ठरावाच्या बाजूने कौल...


(महेश गोंधणे)- चिखली तहसीलदार विजय सवडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा; आता नव्या सरपंचपदासाठी कोणाच्या नावाची चर्चा? 

तालुक्यातील खंडाळा मकरध्वज ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, विद्यमान सरपंच सौ. उज्वला पुरुषोत्तम जाधव यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव अखेर मंजूर झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सत्तासमीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली असून, आता पुढील सरपंच कोण होणार, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

सरपंच सौ. उज्वला जाधव यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्य शेख जावेद शेख गुलाब यांच्यासह अन्य सात ग्रामपंचायत सदस्यांनी १ सप्टेंबर रोजी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दाखल केली होती. या प्रस्तावावर चर्चा व मतदान करण्यासाठी ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता खंडाळा मकरध्वज ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.

ही विशेष सभा तहसीलदार विजय सवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेला सरपंचांसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. प्रारंभी अविश्वास प्रस्तावातील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर प्रस्ताव मतदानासाठी मांडण्यात आला.

८ सदस्यांचा अविश्वास ठरावाच्या बाजूने कौल

मतदानाच्या वेळी ८ सदस्यांनी हात वर करून अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर २ सदस्यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे अविश्वास प्रस्तावाला आवश्यकतेपेक्षा अधिक बहुमत मिळाले.

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३५(३) नुसार अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यसंख्येच्या तीन-चतुर्थांशपेक्षा अधिक बहुमताची आवश्यकता असते. सभेत प्रस्तावाच्या बाजूने आवश्यक बहुमत प्राप्त झाल्याने सरपंच सौ. उज्वला पुरुषोत्तम जाधव यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याचे स्पष्ट झाले.

ग्रामपंचायतीच्या सत्तासमीकरणाला नवे वळण

अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर आता खंडाळा मकरध्वज ग्रामपंचायतीच्या पुढील नेतृत्वाची चर्चा सुरू झाली आहे. सरपंचपदासाठी कोणाचे नाव पुढे येणार, कोणत्या गटाला नेतृत्वाची संधी मिळणार आणि ग्रामपंचायतीत पुढील सत्तासमीकरण कसे राहणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीतील अंतर्गत राजकारणाचीही चर्चा रंगू लागली असून, आगामी काळात सरपंचपदाच्या निवडीदरम्यान आणखी कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अविश्वास ठराव मंजूर झाल्याने विद्यमान सरपंच सौ. उज्वला जाधव यांच्या नेतृत्वाला विराम मिळाला असून, आता खंडाळा मकरध्वज ग्रामपंचायतीच्या नव्या नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात?

अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर आता नव्या सरपंचाच्या निवडीसाठी ग्रामपंचायतीत हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील सरपंच कोण होणार, याबाबत ग्रामस्थांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Previous Post Next Post