बुलडाणा जिल्हा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात साजरा...

– “आयुर्वेद हे केवळ उपचारपद्धती नसून निरोगी जीवन जगण्याची परंपरा आहे,”असा संदेश देत बुलडाणा जिल्हा रुग्णालयात १० वा आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक मा. डॉ.दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आयुष अधिकारी मा. डॉ. प्रशांत तांगडे उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व आयुष विभागाशी निगडित घटक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
धन्वंतरी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात आयुर्वेद शास्त्राचे आराध्य दैवत भगवान श्री.धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आयुर्वेद दिनाचे औचित्य सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ.प्रशांत तांगडे यांनी प्रास्ताविकातून आयुर्वेदाचे महत्त्व पटवून सांगितले.
विविध मार्गदर्शनपर व्याख्याने
या विशेष दिनानिमित्त विविध अधिकारी व तज्ञांनी आयुर्वेदिक औषधोपचार, निरोगी जीवनशैली, रोगप्रतिबंधक उपाय, तसेच प्राचीन वैद्यकीय पद्धतींचे आजच्या जीवनात असलेले महत्त्व यावर व्याख्याने दिली. आयुष विभागाच्या उपक्रमांबद्दल माहिती देत “सर्वांसाठी सुलभ, परवडणारे व प्रभावी उपचार” हेच उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा प्रशासनाचा पुढाकार
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्तम नियोजन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक दत्तात्रय बिराजदार ,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक आयुष डॉ.शशांक मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गीते,औषध निर्माण अधिकारी श्रीमती.रेखा शिंदे, तसेच संपूर्ण आयुष विभागातील कर्मचारी यांचे विशेष योगदान राहिले.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.पंकज राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.शीतल ठाकरे यांनी मानले. उपस्थित सर्व मान्यवर व पाहुण्यांचे मनःपूर्वक आभार मानत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Previous Post Next Post