ह्रदयद्रावक घटना चिखली तालुक्यातील खैरव येथील युवकांचा अपघातात मृत्यु...

 चिखली तालुक्यातील खैरव येथे राहणाऱ्या तीन युवकांचा सिन्नरमध्ये अपघातात मृत्यू झाला. या तिघांची कार कंटेनरला धडकून अपघात झाला. गावातील लोकांमध्ये शोककळा पसरली.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर एमआयडीसी परिसरात २५ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात खैरव येथील तिघा युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघातामुळे खैरव गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्रमिळालेल्या माहितीनुसार, खैरव येथील वैभव रामदास शिंदे यांच्या मालकीच्या जेसीबीसाठी आवश्यक साहित्य आणण्यासाठी वैभव शिंदे, चालक श्रीकिसन हनुमान सुरुशे (रा. पाटोदा) आणि संकेत प्रकाश खोसे (रा. खैरव) हे तिघे सियाज कारने सिन्नर येथे गेले होते. काम आटोपून परत येत असताना सिन्नर एमआयडीसीजवळ त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला.

या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की संकेत प्रकाश खोसे आणि श्रीकिसन हनुमान सुरुशे यांचा जागीच मृत्यू झाला. तर वैभव रामदास शिंदे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचीही प्राणज्योत मालवली, त्यामुळे या अपघातात तिघांचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी नोंद झाली. घटनेची माहिती मिळताच खैरव गावातील सरपंच गजानन शिंदे यांच्यासह नातेवाईकांनी तातडीने सिन्नरकडे धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत मृतदेहांवर शवविच्छेदन प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

या दुर्घटनेमुळे खैरव गावावर शोककळा पसरली असून, एकाचवेळी तिघा युवकांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबियांचा आधार हरपल्याने त्यांच्या घरांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात सर्वत्र शोक व्यक्त केला जात असून, या अपघाताने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post Next Post