(प्रतिनिधी):-सिंदखेडराजा तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी व ढगफुटी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी किनगाव राजा महसूल मंडळातील सावखेड तेजन, पळसखेड चक्का परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली.
या वेळी उपविभागीय अधिकारी संजय खडसे , तहसीलदार दिवटे ,कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी सावखेड तेजन परिसरातील सरपंच व गावकरी व पळसखेड चक्का येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत सांगितले की, “कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. प्रत्येक शेतकऱ्याला भरीव मदत मिळेल.मात्र शेतकऱ्यांनी ईपीक पेराची नोंद करून फार्मर आयडी काढणे आवश्यक आहे.”असे मार्गदर्शन त्यांनी केले.
शेतकऱ्यांनी मात्र त्यांच्या व्यथा मांडताना गंभीर प्रश्न उपस्थित केले.
अनेक शेतकऱ्यांना मदत अत्यल्प असून खर्च भागत नसल्याची व्यथा मांडली.
पळसखेड चक्का येथील शेतकऱ्यांनी विशेषत: लक्ष वेधले की,मागील वर्षी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या अतिवृष्टीची मदत अद्याप मिळालेली नाही.त्या मदतीपासून शेतकरी वंचित असून यावर्षी पुन्हा मोठे नुकसान झाल्याने बीज उत्पादक शेतकरीही गंभीर संकटात आहे.
यावेळी शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला की,“तीन महिन्यांचे पीक असतानाही तीन बोंड सुद्धा नाहीत,मग शेतकरी जगायचं कसं?” अश्या संतप्त भावना त्यांनी मांडल्या व मागणी केली की,राज्य सरकारने नुकसानीचा सर्वेक्षण करताना जर पळसखेड चक्का येथे 90% नुकसान दाखवले असेल, तर शेतकऱ्यांना तितक्याच प्रमाणात पिक विमा मिळायला हवा.पिक विमा कंपनीला वेगळे निकष लावण्याचा अधिकार नसावा.
या संदर्भात जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी तहसीलदारांना स्पष्ट निर्देश दिले की,“जर कोणी शेतकरी मागील मदतीपासून वंचित असेल तर त्यांना ती मदत तातडीने मिळायला पाहिजे.”
यामुळे शेतकऱ्यांच्या मनात आता मोठा प्रश्न उभा राहिला आहे की मागील वर्षाची थकलेली मदत मिळणार आहे का ? की पुन्हा शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागणार आहे असा सूर शेतकऱ्यांन मधे उमटत आहे.