जनता विद्यालयात स्वच्छता पंधरवडा साजरा होत असताना दररोज विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्याच अंतर्गत पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी एक विशेष कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य प्रमोदजी ठोंबरे होते.प्रमुख मार्गदर्शक धार्मिक संस्था प्रमुख विदर्भ प्रांताचे श्री.उमेशजी जपे तसेच कचरा प्रबंधक सहप्रमुख विदर्भ प्रांताचे श्री. ओमप्रकाशजी गोंधणे हे लाभले.पर्यवेक्षक संजय पिवटे व ज्येष्ठ शिक्षक सुदाम चंद्रे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन,धरती पूजन आणि वृक्ष पूजन या विधींनी करण्यात आली.मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल प्रेम निर्माण होणे ही काळाची गरज आहे. वृक्षलागवड, स्वच्छता आणि संवर्धन ही जबाबदारी केवळ शालेय जीवनापुरती नसून आजीवन पाळली पाहिजे.”
पर्यावरण पूरक जीवनशैली चे महत्व सांगताना उमेश जपे यांनी सांगितले की,“बिश्नोई समाजाने पर्यावरण संरक्षणासाठी प्राणार्पण केलेला इतिहास आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. आपण निसर्गाशी नाते जोडले तरच खरी प्रगती साध्य होईल.”
प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगत असताना ओमप्रकाश गोंधणे यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट केले की, “कचऱ्याचे व्यवस्थापन, पुनर्वापर आणि प्लास्टिकमुक्त जीवन ही पर्यावरण संवर्धनाची गुरुकिल्ली आहे.प्रत्येकाने आपापल्या घरापासून आणि शाळेपासून या चळवळीची सुरुवात केली पाहिजे.”
यावेळी विशेष आकर्षण ठरली ती बिश्नोई समाजाच्या पर्यावरण संरक्षणातील योगदानावर आधारित नाटिका,या विद्यालयाचे कला शिक्षक रवींद्र खानंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केली.संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन इको क्लब प्रमुख देवीदास दळवी यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक सुदाम चंद्रे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व घटकांचे मोलाचे सहकार्य लाभले.