–
चिखली (महेश गोंधणे) – तालुक्यातील मेरा खुर्द येथे आज (दि.२३) दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास मेरा चौकी येथील भरचौकात एका तरूणाचा कोयत्याने वार करून निघृण खून करण्यात आला. चिखलीहून काळीपिवळीने आलेल्या या तरूणावर तेथे थांबून असलेल्या दोघाजणांनी कोयत्याने भीषण हल्ला चढविला. त्याच्यावर सपासप वार करत त्याला जागीच ठार मारले. रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह पडलेला होता. या घटनेने मेरा चौकी परिसरासह मेरा गावात एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी अंढेरा पोलिसांनी धाव घेतली असून, पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. पैशाच्या वादातून हा खून झाल्याचे सांगण्यात येत असून, मृतक व मारेकरी हे नातेवाईक असल्याचेही पोलिस सूत्राने सांगितले आहे
दरम्यान, पोलिससूत्राने सांगितले, की मृतक हा नांद्रा कोळी येथील असून, भरत विरशीद (वय ४०) असे त्याचे नाव आहे. मृतक व मारेकरी हे जवळचे नातेवाईक आहेत. ज्ञानदेव सुखदेव निकाळजे या मारेकऱ्यासह त्याच्या साथीदाराने कोयत्याने सपासप वार करून दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास भरत विरसीत याचा निघृण खून केला. मृतकाने मारेकऱ्यांकडून दहा लाख रूपये घेतले होते. पैसे परत मागितले असता देण्यात येत नव्हते. त्याच्यातून वाद झाला होता. त्यामुळे मेरा चौकी येथे मृतकाला बोलावून मारेकऱ्यांनी त्याचा निघृण खून केला. या खुनाबाबत अंढेरा पोलिस कसून तपास करत असून, आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. लवकरच अधिकृत माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे. या खुनाने मेरा चौकी परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.