आपल्याच माणसांनी केलेला 'अराजकीय सत्कार' सर्वात मोठा सन्मान — आ.सौ.श्वेता महाले ..

चिखली विधानसभेतील त्रिमूर्तीचा बुलढाणावासीयांकडून भव्य सत्कार संपन्न


महेश गोंधणे-
श्रद्धा, कृतज्ञता आणि आपुलकीचे अनोखे वातावरण आज कला महाविद्यालय,चिखली येथे अनुभवास आले. शरद शिक्षण व युवक कल्याण संस्था,चिखली आणि सत्यमेव जयते अर्बन को-ऑप.क्रे.सो. लि., बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली विधानसभा मतदारसंघातील त्रिमूर्तीचा —आ.सौ.श्वेताताई महाले मुख्यमंत्री यांचे खासगी सचिव मा. विद्याधर महाले आणि चिखलीचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख — यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला.चिखली व बुलढाण्यातील मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते.
मनोगत व्यक्त करताना आ. सौ.श्वेता महाले यांनी उपस्थितांच्या हृदयाला भिडणारे विचार मांडले. त्या म्हणाल्या, "मोठ्या व्यासपीठांवरून मिळणाऱ्या पुरस्कारांपेक्षा आपल्याच भूमीतील, आपल्याच माणसांनी दिलेला अराजकीय सत्कार माझ्यासाठी सर्वाधिक मोलाचा आहे. चिखली आणि बुलढाणा म्हणजे माझं घर आहे,इथले प्रत्येक कार्यकर्ते, प्रत्येक नागरिक म्हणजे माझं कुटुंब आहे.या कुटुंबाने आज माझ्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला,तो मला आयुष्यभर प्रेरणा देत राहील."
"राजकारण हे सत्तेसाठी नव्हे, तर सेवेसाठी असते. जेव्हा आपल्या भूमीतील लोक आपल्या कामाची दखल घेतात,तेव्हा मनाला खरा आनंद होतो. हा स्नेह म्हणजेच आमच्या कार्याची खरी पावती आहे.
आ.सौ.महाले यांनी सत्काराला उत्तर देताना प्राचार्य विष्णुपंत पाटील यांच्याशी लहानपणापासून असलेल्या ऋणानुबंधाचा आवर्जून उल्लेख केला. "त्यांच्याकडूनच राजकारणाचे बाळकडू मला मिळाले, त्यामुळे ते माझ्यासाठी आदर्श आहेत," असे त्यांनी सांगितले. हा सत्कार कोणताही राजकीय सत्कार नसून आपल्या माणसांनी आपल्या माणसांचा केलेला निर्मळ सत्कार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजकारण व समाजकारण करताना पदोपदी संघर्ष करावा लागला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि चिखली विधानसभा मतदारसंघाच्या सर्वकश विकासासाठी अहोरात्र झटत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.नळ योजना, गावातील रस्ते,अंगणवाड्या, समाज मंदिरे अशा अनेक कामांसाठी पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. 
"युतीमध्ये काम करणाऱ्यांनी सर्वांनीच महायुतीचा धर्म पाळला पाहिजे. वैचारिक बांधिलकी ठेवूनच आपल्या पक्षाचा विकास साधायला हवा," असेही त्यांनी ठणकावून सांगितले. शेवटी करवंड येथे छत्रपती शिवाजी महाराज व गुणवंताबाई यांच्या विवाहस्मृतींना उजाळा देणाऱ्या कार्यक्रमास सर्वांनी यावे,असे आवाहनही त्यांनी केले.
 विष्णू पाटील यांनी केलेल्या भाषणात विद्याधर महाले यांच्या कार्याचे मार्मिक वर्णन त्यांनी केले.ते केवळ एका व्यक्तीचे नाव नाही,तर ते चिखली व बुलढाण्याच्या असंख्य सामान्य कुटुंबांच्या स्वप्नांची ओळख आहे. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव या अत्यंत महत्त्वाच्या पदावर असताना त्यांनी आपल्या मुळांशी कधीही फारकत घेतली नाही.त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील शासकीय कामे सुकर झाली,अनेक विकासकामांना मुख्यमंत्री कार्यालयाच्या पातळीवर गती मिळाली आणि स्थानिक नागरिकांचे अडलेले प्रश्न मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले."चिखलीचा एखादा शेतकरी,एखादा विद्यार्थी किंवा एखादी आई जेव्हा सरकारी मदतीसाठी दार ठोठावते,तेव्हा विद्याधर महालेंन सारखा विश्वासू माणूस त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो,"असे विष्णू पाटील यांनी भावपूर्ण शब्दांत सांगितले.
मनोगत व्यक्त करताना विद्याधर महाले म्हणाले, "याच शहरात माझे बालपण व शिक्षण झाले, त्यामुळे या मातीशी माझे विशेष ऋणानुबंध आहेत. मंत्रालयात माझ्या जिल्ह्यासाठी विविध योजना कशा मिळतील हाच माझा सतत प्रयत्न असतो. चिखलीच्या विकासाकरता शनिवार-रविवारीही आम्ही नेहमी हजर असतो." मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य महाले दांपत्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारताच्या विकासातील प्रचंड योगदानाचाही त्यांनी भाषणात आवर्जून उल्लेख केला.पैनगंगा नदीजोड प्रकल्पाकरिता ८८ हजार कोटींची तरतूद करून त्याला मान्यता मिळवून देण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
सुसंस्कृत घराण्यातून आलेले, शिस्तप्रिय, लोकप्रिय, आध्यात्मिक  अशी
भक्कम पकड असलेले व्यक्तिमत्व म्हणून विद्याधर महाले यांनी राज्यभरात नावलौकिक मिळवला आहे. काँग्रेस कालावधीत दशा झालेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात दिशा दाखवण्याचे कार्य महाले दांपत्य निष्ठेने करत असल्याचे उपस्थितांनी गौरवोद्गारांत नमूद केले.
सत्कार समारंभाचे आणखी एक पैलू म्हणजे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांचा सत्कार. दशकानुदशके चिखलीच्या मातीत सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या पंडितदादांना आमदार श्वेता महाले यांनी त्यांच्या निष्ठेचे आणि अखंड सेवाभावाचे चीज करीत नगराध्यक्षपदाची संधी दिली. हा निर्णय चिखलीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक स्फूर्तिदायक संदेश म्हणून रुजला आहे.
यावेळी पंडितदादा देशमुख  म्हणाले,"मी कधी पदाच्या लालसेने काम केले नाही. मात्र आमदार ताईंनी माझ्या छोट्याशा कार्याची दखल घेऊन मला जे मानाचे स्थान दिले.ताई स्वतःच्या निवडणुकीपेक्षा माझ्या निवडणुकीसाठी जास्त फिरल्या.हा विश्वास सार्थ ठरवणे हेच माझे ध्येय आहे."
या प्रसंगी वक्त्यांनी ठणकावून सांगितले की पक्षाची खरी ताकद मोठ्या नेत्यांमध्ये नाही, तर जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे — आणि त्यांना संधी दिल्यासच संघटना मजबूत होते.
या सोहळ्यास रामकृष्णदादा शेटे, सिनेट सदस्य डॉ.आशुतोष गुप्ता, कार्यक्रमाध्यक्षा व संस्थाध्यक्षा सौ. सिंधुताई पाटील,संस्थापक अध्यक्ष प्राचार्य विष्णुपंत पाटील, अध्यक्ष एकनाथराव थिगळे,संस्था उपाध्यक्ष पांडुरंग काकडे, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष काळे पाटील,भाजपा जिल्हा महामंत्री दत्ता पाटील, भाजपा शहराध्यक्ष  मंदार बाहेकर,तालुका अध्यक्ष सतीश पाटील,  विजय खरे, डॉ.उबरहंडे, मुन्नाभाऊ बेंडवाल, नंदुभाऊ सवडतकर, अजिंक्य पाटील,अरविंद शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. गोविंद गायके सर यांनी केले. शरद शिक्षण व युवक कल्याण संस्था आणि सत्यमेव जयते अर्बनच्या संपूर्ण परिवाराप्रती आमदार सौ.महाले यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली... 
Previous Post Next Post