तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन सभा चिखली व बुलढाणा येथे संपन्न..

 कृषी विभागाच्या त्रुटींवर आ.सौ.श्वेता महाले यांनी बोट ठेवून अधिकाऱ्यांना दिली कडक ताकीद...


महेश गोंधणे- 

चिखली तालुका व चिखली विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या बुलढाणा तालुक्यातील गावासाठी तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन सभेत चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आ.श्वेता महाले यांनी कृषी विभागाच्या कामकाजातील उणिवांवर थेट बोट ठेवत संबंधित अधिकाऱ्यांना कडक शब्दांत ताकीद दिली. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी न होणे, विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव आणि फलोत्पादन योजनांचा अपुरा प्रसार या मुद्द्यांवर आमदार श्वेता महाले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसंदर्भात कोड जनरेट करणे, मस्टर काढणे, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणे या प्रक्रियेत मागील वर्षी असंख्य तक्रारी प्राप्त झाल्याची गंभीर दखल आमदार श्वेता महाले यांनी घेतली.यावर्षी सुधारणा न झाल्यास मी स्वतः लक्ष घालून कठोर कारवाई करेन, असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला. पीककर्ज वाटपापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही त्यांनी बँका व सहकार विभागाला जाब विचारला.शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते, बी बियाणे, कृषी कर्ज उपलब्ध होण्यासाठी कृषी विभाग, कृषी केंद्रे, सहकार विभाग आणि महसूल विभाग यांच्यात योग्य समन्वय असणे अत्यावश्यक असल्याचे आ. श्वेता महाले यांनी ठणकावून सांगितले. "विभागांनी एकत्र येऊन काम केले तरच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद, कृषी विभाग यांनी सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, पाझर तलाव आदी संरचनांची दुरुस्ती तातडीने पुढील दोन महिन्यांत पूर्ण करावे व चिखली तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात ७३,००० हेक्टरवर सोयाबीन पेरणीचे नियोजन असले तरी, सोयाबीनसोबत इतर पिकांकडेही शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन आ.श्वेता महाले यांनी केले.फलोत्पादन क्षेत्र वाढविण्यासाठी पोकरा, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा प्रभावीपणे वापर व्हावा, यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवावी तसेच मागील वर्षी हुमणी अळीमुळे झालेल्या नुकसानाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कृषी विभागाने वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात,असा इशाराही त्यांनी दिला.

कापूस उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने कापूस पीक परिसंवाद कार्यशाळा आयोजित करण्याचे आमदार  श्वेता महाले यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी कृषी विभागाने सक्रिय भूमिका बजावावी, असेही त्यांनी सांगितले.

चिखली तालुक्यात महाविस्तार A.I. ॲपचा वापर होत असल्याबद्दल आमदार श्वेता महाले  यांनी कृषी विभागाचे अभिनंदन केले.मात्र AGRISTACK योजनेंतर्गत शेतकरी नोंदणीचे लक्ष्यांक आणखी वाढवण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

संपूर्ण अमरावती महसूल विभागात चिखली विधानसभा मतदारसंघाला सर्वाधिक लाभ मिळाल्याचे नमूद करत आ.सौ.श्वेता महाले यांनी भविष्यातही हे यश अबाधित राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करावे, असा आग्रह धरला. येणारा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक सोयीस्कर आणि फायदेशीर ठरावा, यासाठी कृषी, महसूल, सहकार व जलसंधारण या सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

चिखली विधानसभा मतदारसंघांतर्गत बुलढाणा तालुक्यातील गावांसाठी देखील बुलढाणा येथे स्वतंत्र खरीप पूर्व आढावा बैठक घेण्यात आली,बुलढाणा येथील बैठक बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आ.संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पार पडली.

चिखली येथील बैठकीस खालील मान्यवर होते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, तालुका कृषी अधिकारी अशोक सुरडकर,मंडळ कृषी अधिकारी दिनेश लंबे, मंडळ कृषी अधिकारी भगवान कुलकर्णी,मंडळ कृषी अधिकारी विजय धांडे, डॉ.कृष्णकुमार सपकाळ (भाजप तालुका अध्यक्ष), संजय महाले, संतोष काळे (जिल्हा अध्यक्ष भायुवा मोर्चा), जितेंद्र कलंत्री,सुधीर चेके ,अशोक पाटील,नीरज गायकवाड,महेश महाजन (अध्यक्ष असोसिएशन) आदी मान्यवर उपस्थित होते.

तर बुलढाणा येथील बैठकीस आ. संजय गायकवाड,  देविदास पाटील,अनिल जाधव, सुनील देशमुख,योगेश राजपूत, डॉ.उबरहांडे,संदीप उगले,सतीश भाकरे (तालुका अध्यक्ष भाजप) आदी उपस्थित होते...

Previous Post Next Post