३७० वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक सोहळ्याच्या स्मृतींना उजाळा देणार महाराष्ट्र सरकार...
महेश गोंधणे-
छत्रपती शिवाजी महाराज आणि गुणवंताबाई इंगळे यांच्या ऐतिहासिक विवाह सोहळ्याला यंदा ३७० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर चिखली तालुक्यातील करवंड येथे १५ व १६ एप्रिल रोजी भव्य ‘करवंड महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांनी नुकताच दौरा केला. यावेळी “हा केवळ सरकारी कार्यक्रम न राहता जनसामान्यांचा ‘लोकोत्सव’ व्हावा,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
महोत्सवाच्या अनुषंगाने ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता आणि परिसर सुशोभीकरणासाठी रविवारी (२९ मार्च) सकाळी ८:३० वाजता ‘महा-श्रमदान’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. करवंड महोत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व युवक, शिवभक्त, धारकरी तसेच विविध सामाजिक मंडळांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या उपक्रमात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेची संपूर्ण जिल्हा टीम सक्रिय सहभाग घेणार असून, ऐतिहासिक वारशाचे जतन आणि स्वच्छता हे आपले ‘परम कर्तव्य’ म्हणून पार पाडले जाणार आहे.
दरम्यान, या महोत्सवाच्या भव्य आयोजनासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आ. श्वेताताई महाले यांनी सांस्कृतिक मंत्रालयाकडून १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. स्थानिक युवकांनी आधीच केलेल्या श्रमदानाचे विद्याधर महाले यांनी विशेष कौतुक करत, या उपक्रमामुळे महोत्सवाला लोकसहभागाचे बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
३७० वर्षांपूर्वी ज्या विवाह सोहळ्यात आपल्या पूर्वजांनी सहभाग घेतला होता, त्याच परंपरेचे वारसदार म्हणून आजच्या पिढीनेही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक स्थळाची सेवा करावी, असे विद्याधर महाले यांनी यावेळी केले.
याप्रसंगी करवंड महोत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद देशमुख,भाजपा तालुकाध्यक्ष अमोल साठे,प्राचार्य अण्णासाहेब म्हळसणे, प्रा. विजय घ्याळ,भास्करराव अडाळकर,सचिन गरड, अनिल सपकाळ, गजानन पवार आणी असंख्य गावकरी व शिवप्रेमी मंडळी हजर होती.
