चिखली शहरात उत्सव संपूनही विद्युत पोलवर लटकतात जीर्ण झेंडे;

 अवमान टाळण्यासाठी तातडीने हटवण्याची मागणी


चिखली-सार्वजनिक जयंत्या आणि सण-उत्सव संपल्यानंतरही चिखली शहर हद्दीतील प्रमुख रस्ते, चौक आणि विद्युत खांबांवर लावलेले झेंडे तसेच लटकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सततचे ऊन, वारा आणि पावसामुळे हे झेंडे आता अत्यंत मळकट, जीर्ण आणि फाटलेल्या अवस्थेत असून त्यांचे रंगही फिके झाले आहेत. याप्रकरणी चिखली शहरातील सजग नागरिक सुनील धंदर यांनी चिखली नगरपालिका प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन हे विद्रूप झालेले झेंडे तातडीने हटवण्याची मागणी केली आहे.सार्वजनिक ठिकाणी आदरस्थानी असणारी विविध प्रतीके आणि झेंडे अशा प्रकारे अवमानकारक स्थितीत राहिल्याने नागरिकांच्या भावना दुखावत आहेत, तसेच शहराचे सौंदर्यही बिघडत आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाने जातीने लक्ष घालावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.झेंडे काढण्याचा कालावधी निश्चित करण्याची मागणीकेवळ तात्पुरती कारवाई न करता, भविष्यात शहरातील स्वच्छता व पावित्र्य कायम राहावे यासाठी ठोस नियमावली तयार करावी, असा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. त्यानुसार, कोणत्याही सण किंवा जयंतीचे झेंडे किंवा प्रचार साहित्य लावल्यास, उत्सव संपल्यानंतर जास्तीत जास्त २४ ते ४८ तासांच्या आत ते आयोजक मंडळाने किंवा प्रशासनाने काढून घेणे बंधनकारक करावे, असा आग्रह धरण्यात आला आहे.या निवेदनाची एक प्रत योग्य त्या कार्यवाहीसाठी पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन आणि  स्वच्छता निरीक्षक,अतिक्रमण विभाग प्रमुख, चिखली नगरपालिका यांनाही माहितीस्तव पाठवण्यात आली आहे.

Previous Post Next Post