आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी (दि. 21 जून) तालुका क्रीडा संकुल, चिखली येथे आयोजित करण्यात आलेल्या योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनी केले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्तीचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे आमदार श्वेता महाले यांनी नमूद केले. निरोगी समाज आणि सशक्त राष्ट्र घडविण्यासाठी योग हा प्रभावी मार्ग असून प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा, असे त्या म्हणाल्या.
तालुका प्रशासन चिखली, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा, तालुका क्रीडा संकुल समिती चिखली तसेच विविध योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 21 जून रोजी सकाळी 7 ते 7.45 या वेळेत तालुका क्रीडा संकुल येथे योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. आयुष मंत्रालयाने निर्धारित केलेल्या मानकांनुसार हा कार्यक्रम पार पडणार आहे.
आमदार श्वेता महाले यांनी चिखली शहर व तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी, महिला मंडळे, युवक-युवती, क्रीडा संघटना, एनसीसी, एनएसएस, भारत स्काऊट गाईड, योग संस्था तसेच सर्व नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन योगाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले आहे.
योगामुळे शरीर सुदृढ राहण्यासोबतच मनाची एकाग्रता, सकारात्मकता आणि कार्यक्षमता वाढते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम न राहता योगमय जीवनशैली स्वीकारण्याचा संकल्प करण्याची संधी असल्याचेही आमदार श्वेता महाले यांनी सांगितले.
यावेळी तालुका क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनीही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.
