चिखली तालुका पत्रकार संघाचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना निवेदन
चिखली - ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिल्याच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत त्यांच्याविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यान्वये तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी,या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ अंतर्गत चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारी (दि. 26 जून) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिखली पोलीस स्टेशनमार्फत निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, खासदार संजय दिना पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या वादग्रस्त विधानाबाबत स्पष्टीकरण विचारले असता पत्रकारांना अर्वाच्य शिवीगाळ केली तसेच "पुन्हा विचारायला आलात तर मारून पाठवीन" अशी उघड धमकी दिली. हा प्रकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर थेट हल्ला असून पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा आणणारा आहे.
पत्रकारांना निर्भयपणे कर्तव्य बजावता यावे, यासाठी पत्रकार संरक्षण कायद्यानुसार संबंधित खासदाराविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी पत्रकार संतोष लोखंडे,कैलास गाडेकर, रमाकांत कपूर,रविंद्र फोलाने, इफ्तेखार खान,सचिव महेश गोंधणे, कोषाध्यक्ष छोटु कांबळे, संघटक भरत जोगदंडे, सहसचिव रमिझ राजा, कमलाकर खेडेकर, योगेश शर्मा, सय्यद साहिल, राजेश बिडवे, किरण शेजोळ, ऋषि भोपळे यांच्यासह चिखली तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकारांना धमकी प्रकरणी चिखलीत संताप गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन करू – नितीन फुलझाडे
"पत्रकारांना धमकावणे, शिवीगाळ करणे आणि मारहाणीची भाषा करणे हे लोकशाहीतील चौथ्या स्तंभावर थेट हल्ला आहे. पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असताना अशा घटनांकडे दुर्लक्ष होणे दुर्दैवी आहे. खासदार संजय दिना पाटील यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अन्यथा तीव्र आंदोलन करू.
