मुलींनी एचपीव्ही लसीकरणाचा लाभ घ्यावा.. आ. श्वेता महाले.

 गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी बुलढाण्यात लसीकरण मोहीम सुरु..



महेश गोंधणे-

महिलांमध्ये आढळणारा गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा एक गंभीर आजार आहे. या आजारापासून जिल्ह्यातील मुलींचे संरक्षण व्हावे यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आ.श्वेता महाले यांनी २०२४ पासून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश येऊन बुलढाणा जिल्ह्यात ८ मार्च २०२६ पासून एचपीव्ही लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे.

आमदार सौ.श्वेता महाले यांनी विधानसभेत वेगवेगळ्या प्रकारे निवेदने आणि प्रश्न उपस्थित करून एचपीव्ही लसीकरण बुलढाणा जिल्ह्यात राबविण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या दीर्घकाळाच्या प्रयत्नांमुळेच जिल्ह्यातील मुलींना आता ही संरक्षणात्मक लस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या मोहिमेअंतर्गत १४ ते १५ वर्ष वयोगटातील सर्व मुलींना एचपीव्ही लस देण्यात येणार आहे. गावपातळीवर शाळा, अंगणवाडी व शासकीय आरोग्य संस्थांमार्फत लसीकरण सत्रे आयोजित केली जात असून आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका सक्रियपणे कार्यरत आहेत.

आमदार सौ. श्वेता महाले  यांनी सर्व पालकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवा किंवा नकारात्मक व्हिडिओंना बळी न पडता आपल्या मुलींना जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत किंवा शाळेत नेऊन एचपीव्ही लस द्यावी. ही लस पूर्णपणे सुरक्षित व प्रभावी असून आपल्या मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्याची ही सुवर्णसंधी आहे, असेही त्यांनी नमूद केले....

Previous Post Next Post