आमदार श्वेता महाले यांनी विधानसभेत सरकारला धरले धारेवर..

 विदर्भ वंदन न्यूज- महेश गोंधणे

चिखली मतदारसंघातील ३,०९६ घरकुल लाभार्थ्यांचे ११ कोटींचे हप्ते अडकले..


आपले एक छोटेसे घर असावे, हे प्रत्येक गरीब माणसाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. मात्र चिखली मतदारसंघात या योजनेचे हप्ते महिनोंमहिने मिळत नसल्याने हजारो गरीब कुटुंबे अडचणीत सापडली आहेत. हा प्रश्न थेट विधानसभेत मांडत चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी सरकारकडे ठोस उत्तरे मागितली.

घर बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर लाभार्थ्यांना अनुदान मिळणे अपेक्षित असते. परंतु मागील काही महिन्यांपासून हे पैसे मिळणे बंद झाले आहे. आ.श्वेता महाले  यांनी विधानसभेत मांडलेल्या आकडेवारीनुसार, चिखली तालुक्यातील १,९६४ लाभार्थ्यांचे ९ कोटी ३६ लाख ८० हजार रुपये अडकले आहेत. बुलढाणा तालुक्यातील ११३२ लाभार्थ्यांचे २ कोटी ३४ लाख ८५ हजार रुपये थकीत आहेत. म्हणजेच एकूण ३,०९६ लाभार्थ्यांचे तब्बल ११ कोटी ७१ लाख ६५ हजार रुपये (अकरा कोटी एकाहत्तर लाख पासष्ट हजार) अद्याप मिळालेले नाहीत.

आमदार श्वेता महाले  यांनी विधानसभेत सरकारला थेट तीन प्रश्न विचारले. हप्ते वाटपासाठी नवीन स्पर्श प्रणाली कधी सुरू होणार? लाभार्थ्यांचे अडकलेले पैसे नक्की कधी मिळणार? आणि हे पैसे अडण्यामागे नेमके कारण काय व त्यास जबाबदार कोण?

ग्रामविकास व पंचायत राजमंत्री  जयकुमार गोरे यांनी उत्तर देताना सांगितले की, चिखली मतदारसंघातील ११ कोटींची देयके का थांबली हे तपासून पाहतो. बुलढाणा जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांचे पैसे तातडीने देण्यासाठी लवकरच बैठक घेऊ, असेही त्यांनी आश्वासन दिले.

तसेच जमिनीच्या प्रश्नावर बोलताना मंत्री म्हणाले की, भूमिहीन लाभार्थ्यांना जागेसाठी शासन एक लाख रुपये देते, गायरान जमीनही उपलब्ध करून दिली जाते. दर पंधरा दिवसांनी वरिष्ठ पातळीवर याचा आढावा घेतला जातो. कुणीही घरापासून वंचित राहू नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

वाळूबाबत मंत्र्यांनी सांगितले की, सरकारने वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लाभार्थ्यांनी त्यासाठी बीडीओ किंवा तहसीलदारांकडे जाऊन पास काढणे आवश्यक आहे. ते वाळू कुठून घ्यायची ते सांगतील.

घरकुलासाठी शासकीय दराने वाळू मिळत नाही, पण बेकायदा वाळू तस्करी मात्र बिनधास्त सुरू आहे, याकडे आ. सौ. श्वेता महाले  यांनी लक्ष वेधले. शिवाय, प्रत्येक गावातील रिकाम्या जागांचा उपयोग करून एखादी छोटी टाऊनशिप उभारता येईल का,याबाबतही त्यांनी सूचना केली.

देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी  आणि राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या या योजनेमुळे गरिबांचे घराचे स्वप्न पूर्ण होत आहे, याबद्दल आमदार महाले यांनी आभार मानले. मात्र लाभार्थ्यांना वेळेत हप्ते मिळावेत यासाठी आपण सतत पाठपुरावा करत राहू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला...

Previous Post Next Post