चिखली व बुलढाणा तालुका आढावा बैठकीत महत्त्वाचे निर्णय..
महेश गोंधणे-
चिखली विधानसभा मतदारसंघातील चिखली व बुलढाणा या दोन्ही तालुक्यांत येत्या दोन महिन्यांत पाणीटंचाई उद्भवू नये यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनी आज दोन्ही तालुक्यांत स्वतंत्र पाणी टंचाई आढावा बैठका घेतल्या. संबंधित विभागांचा सखोल आढावा घेऊन आमदार सौ. श्वेता महाले यांनी महत्त्वाचे निर्देश दिले.
चिखली तालुक्यासाठी श्रीराम नागरी पतसंस्थेच्या जिजाऊ सभागृह, चिखली येथे आढावा बैठक घेण्यात आली. आ.श्वेता महाले यांनी यावेळी स्पष्ट केले की, जेथे गरज असेल तेथे जीएसडीमार्फत बोअर घेण्याची व्यवस्था करण्यात येईल. एमएसईबीशी संबंधित अडचणी तत्काळ सोडवाव्यात, पाणी पुरवठा योजनांना सहकार्य करावे आणि कोणत्याही परिस्थितीत विद्युत लाइन कट करू नये, जेणेकरून नागरिकांचा पाणी पुरवठा सुरळीत राहील, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
या बैठकीत पळसखेड जयंती, दिवठाणा, पेठ, बोरगाव वसू, साकेगाव, बोरगाव काकडे,मंगरुळ नवघरे,असोला नाईक, उत्रादा व आमखेड या गावांमधील विहीर अधिग्रहणाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेला विहीर अधिग्रहणाचा निधी येत्या आठ दिवसांत प्राप्त होणार असून तो मिळताच तत्काळ वाटप करण्यात येईल, अशी माहिती आमदार सौ.श्वेता महाले यांनी यावेळी दिली.
या बैठकीस गटविकास अधिकारी समाधान वाघ, तहसीलदार विजय सवडे, उपजिल्हाधिकारी सौरभ गावंडे, नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, संजय गाडेकर, डॉ. कृष्णकुमार सपकाळ, जिल्हाध्यक्ष भाजप युवा मोर्चा संतोष काळे, नीरज गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस संतोष परिहार, उपकार्यकारी अभियंता पाणी पुरवठा अनिल चव्हाण, सहायक गटविकास अधिकारी गजानन पोफळे आदी उपस्थित होते.
बुलढाणा तालुका बैठक धाड येथे संपन्न..
बुलढाणा तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी धाड येथे आ.श्वेता महाले यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा तालुका पाणी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. हातपंप दुरुस्ती, विहीर अधिग्रहण, विहीर दुरुस्ती,पाईपलाईन अशा विविध उपाययोजना तत्काळ राबवून नागरिकांना सुलभ पाणी पुरवठा करावा तसेच जलजीवन मिशन अंतर्गत ३४ पैकी १६ गावांच्या योजना पूर्ण झाल्या असून उर्वरित प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे आ. सौ.महाले यांनी बजावले. केंद्र सरकारने प्रलंबित निधी दिला असून तो लवकरच संबंधित विभागाला उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील योजनाही तत्काळ पूर्ण कराव्यात असे निर्देश यावेळी दिले.
या बैठकीस गटविकास अधिकारी अमिता पवार, देविदास जाधव व संजय गाडेकर, ना. तहसीलदार अनंता पाटील,श्रीरंग अण्णा वेंडोले, ॲड.सुनील देशमुख, अनिल जाधव, योगेश राजपुत, शिवसेना नीलेश गुजर, प्रदीप टाकसाळ, विशाल वीसपुते व अमोल शिंदे, उपअभियंता पाणी पुरवठा नीतेश खुसाळकर, उपकार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण किरण पाटील, महावितरण उपकार्यकारी अभियंता कायदे, निलेश देठे, विष्णू वाघ,किरण सरोदे, संदीप उगले तसेच तुळशीराम काळे, विष्णू उगले, गणेश बाजी, किशोर साखरे,दिगंबर जाधव,जितेंद्र तायडे यांच्यासह सरपंच व सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते...

