चिखली (महेश गोंधणे):-जगातील सर्वात मौल्यवान धातू असलेल्या सोन्याचे व्यवहार करणाऱ्या सुवर्णकार समाजाचे मन देखील सोन्यासारखेच शुद्ध, निर्मळ आणि खऱ्या अर्थाने कस लावलेले आहे, असे हृदयस्पर्शी गौरवोद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक (Personal Assistant) विद्याधर महाले यांनी काढले.
चिखली येथे सुवर्णकार समाजातर्फे आयोजित नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या भव्य सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत विश्वासू आणि जवळच्या सहकारी म्हणून ओळखले जाणारे विद्याधर महाले हे प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
यावेळी विद्याधर महाले यांनी सुवर्णकार समाजाच्या कार्याचे, शिस्तीचे आणि व्यावसायिक नैतिकतेचे मनःपूर्वक कौतुक केले. ते म्हणाले की, "चिखलीतील सुवर्णकार समाजाने केवळ व्यवसायातच नव्हे, तर सामाजिक जबाबदारी पार पाडण्यातही कायमच आदर्श ठेवला आहे. असा समाज राज्याची खरी संपत्ती आहे."
समाजाने केलेल्या विविध मागण्यांबाबत बोलताना विद्याधर महाले यांनी स्पष्टपणे सांगितले की, सुवर्णकार समाजाच्या सर्व न्याय्य मागण्या आ. सौ.श्वेता महाले यांच्या माध्यमातून शासन दरबारी प्राधान्याने मांडण्यात येतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाच्या स्तरावरूनही सकारात्मक पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
सुवर्णकर समाज राबवत असलेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचेही महाले यांनी विशेष कौतुक केले आणि असे उपक्रम समाजाला एकसंध ठेवण्यासाठी अत्यावश्यक असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष भिकू लोळगे होते. व्यासपीठावर नवनिर्वाचित नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, नगरसेविका श्रीमती ज्योतीताई वाळेकर, माजी प्राचार्य भुसारी सर तसेच सुवर्णकार समाजाचे उपाध्यक्ष दीपक काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष पंडितराव देशमुख म्हणाले की, "सुवर्णकार समाज हा केवळ दागिने घडवणारा समाज नसून तो अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीने व्यवसाय करणारा समाज आहे. समाजाच्या विश्वासावरच हा व्यवसाय टिकून आहे." सुवर्णकार समाजभवनासाठी नगरपालिकेकडून जे जे सहकार्य लागेल, ते प्रदान करण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
चिखली शहर व परिसरातील सुवर्णकार समाजातील महिला, पुरुष आणि युवक मोठ्या उत्साहाने व संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या पुष्पगुच्छ देऊन स्वागताने झाली, तर सांगता महाप्रसादाने करण्यात आली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन रेणुकादास मुळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शिवहरी सागळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजातील नवयुवकांनी विशेष परिश्रम घेतले.
