चिखली(महेश गोंधणे):- गोवंश जनावरांची क्रूरपणे व कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या टोळीवर चिखली पोलिसांनी मोठी कारवाई करत ५६ बैल, दोन आयशर वाहने आणि सुमारे ३१ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई २२ जानेवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास बुलढाणा – जालना रोडवरील दांडगे ले-आऊट समोर, चिखली येथे करण्यात आली. कोणताही वैध परवाना नसताना गोवंश बैलांना दोरीने एकमेकांना बांधून, दाटीदाटीने कोंबून, चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता अत्यंत निर्दयपणे कत्तलीसाठी नेले जात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
या प्रकरणी ओम मदनराजे गायकवाड (वय २१, रा. पळ सखेड दौलत, ता. चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये साबीर अहमद अलीम अहमद (रा. खानापूर, उत्तर प्रदेश), मुक्तार सुलतान कुरेशी (रा. जामनेर, जि. जळगाव), मोहम्मद अरशर मोहम्मद तय्यब (रा. मालेगाव, जि. नाशिक), शेख असलम शेख कुरेशी (रा. शिवणा, ता. सिल्लोड) आणि ज्ञानेश्वर संतोष सुरडकर (रा. मादणी, ता. सिल्लोड) यांचा समावेश आहे.पोलिसांनी MH 43 BP 2551 आणि MH 04 GR 0053 क्रमांकाच्या दोन आयशर वाहनांतून एकूण ५६ गोवंश बैल ताब्यात घेतले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३१,४०,००० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आरोपींविरुद्ध १)प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६०,11(1)(d)
२)प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६०, 11(1)(e)
३)प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६०, 11(1)(f)
४)महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६,५ए
५)महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६,५बी
६)महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६,९,
७)महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६,११
८)महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१,119
वरील प्रमाणे आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर, विजय किटे, बिट जमादार अनिल वाघ, तसेच डी.बी. पथकातील अमोल गवई, प्रशांत धंदर, राहुल पायघन, अजय इटावा, अमोल इंगळे आणि सुनील राजपूत यांचा सहभाग होता.आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.