९२ वी पुरूष व २० वी महिला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप..
शेगाव (जि. बुलढाणा):-शहरासह ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत यासाठी शासन सदैव पाठीशी उभे राहील, असा विश्वास क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला.महाराष्ट्र राज्य राजमाता जिजाऊ बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
या स्पर्धेत जळगाव (खान्देश) जिल्ह्याने प्रथम, पुणे जिल्ह्याने द्वितीय,तर मुंबई उपनगर संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
यावेळी महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या निवडणुकीचा उल्लेख करताना सांगण्यात आले की, निवडणूक प्रक्रियेत प्रविण दरेकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून ते राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडून आले आहेत.त्यांच्या कार्यकाळात खेळाडूंना निश्चितच न्याय मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
क्रीडामंत्री कोकाटे पुढे म्हणाले की, नुकत्याच विधानपरिषदेत प्रविण दरेकर यांनी बॉक्सिंग खेळासंदर्भात प्रश्न उपस्थित केला असून, सुविधांबाबत सकारात्मक उत्तर मिळाले आहे. राज्यात स्पोर्ट्स कोड व कायदा आणण्यात येणार असून बोगस खेळाडूंवर कडक कारवाई केली जाईल. शहरासह ग्रामीण भागातील बॉक्सिंग खेळाडूंना आवश्यक सुविधा देण्यात येतील. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचा एक तरी खेळाडू सुवर्णपदक जिंकेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
“राजाश्रय नसेल तर कितीही हुशार खेळाडू असला तरी तो पुढे जाऊ शकत नाही.क्रीडा खात्याचे कार्य निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. बॉक्सिंगसारख्या देशी खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. महाराष्ट्राने अनेक शिवछत्रपती पुरस्कार विजेते घडवले आहेत,”असेही ते म्हणाले.
बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी खेळाडूंना विश्वास देताना सांगितले की, बॉक्सिंग खेळाला शासन मान्यता मिळवून देण्यात आली आहे. खेळाडूंना नोकरीत आरक्षण, सक्षम बॉक्सर घडवण्यासाठी आवश्यक ताकद, राजाश्रय व विश्वास देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बाँक्सिंग संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विठ्ठलराव लोखंडकार यांनी बॉक्सिंग खेळाचे महत्त्व विशद केले व प्रविण दरेकर यांनी विधान परिषदेत बॉक्सिंग खेळाबाबत प्रश्न उपस्थित करून खेळाडूंना शासन सेवेत आरक्षण मंजूर केल्याबद्दल शासनाचे आभार मानले.
यावेळी केंद्रीय आयुष राज्य मंत्री प्रतापराव जाधव,ना.हेमंत पाटील, डॉ.अपर्णाताई संजय कुटे, विजय राऊत,आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन शिप्रा मानकर यांनी केले.
समारोपप्रसंगी आभार प्रदर्शन महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.संतोष आंबेकर ,निलेश इंगळे यांनी केले.
बाँक्सिंग फेडरेशन चे सहायक प्रकल्प अधिकारी राजू महाले,जिल्हा सहसचिव विनोद टिकार,संकेत धामंदे,संकेत सरोदे व आरती खंडागळे व सहकार्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल बॉक्सिंग संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विठ्ठलराव लोखंडकार यांचा क्रिडामंत्री माणिकराव कोकाटे,ना.प्रविण दरेकर, हेमंत पाटील,डाॅ अपर्णाताई कुटे यांनी गौरव केला.