विज्ञानाशिवाय आधुनिक जीवनाची कल्पनाच अशक्य.. आ.श्वेताताई महाले
(महेश गोंधणे):-चैतन्य गुरुकुल व कनिष्ठ महाविद्यालय, मकरध्वज खंडाळा येथे सन 2025–26 या शैक्षणिक वर्षासाठी आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी आज मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रदर्शनीचे उद्घाटन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, आरोग्य, कृषी व नवकल्पना या विषयांवर आधारित विविध आकर्षक प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आमदार श्वेता ताई महाले पाटील यांनी विशेष कौतुक केले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना आ.सौ.श्वेताताई महाले म्हणाल्या,
“आजच्या धावत्या जगात विज्ञान हे केवळ अभ्यासाचे विषय न राहता दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. आरोग्य, शेती, उद्योग, दळणवळण, माहिती तंत्रज्ञान ते अंतराळ संशोधन—प्रत्येक क्षेत्रात विज्ञानामुळेच मानवी जीवन अधिक सुलभ, सुरक्षित आणि समृद्ध झाले आहे.”तसेच
“मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात देशाने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात ऐतिहासिक प्रगती केली आहे. चांद्रयान-3 ची यशस्वी चंद्रमोहिम, गगनयान मिशनची तयारी, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, आयआयटी, आयआयएम व संशोधन संस्थांचे बळकटीकरण, तसेच वैद्यकीय व जैवतंत्रज्ञानातील संशोधन ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. आज भारत विज्ञानाच्या बळावर आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल करत आहे.”
विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षापुरते विज्ञान न शिकता संशोधन, नवकल्पना व समस्यांवर उपाय शोधण्याची वृत्ती विकसित करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या विज्ञान प्रदर्शनीस कार्यक्रमाचे अध्यक्ष आशुतोष चौधरी, मार्गदर्शक आशिष पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा, प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी समाधान वाघ, शिक्षण अधिकारी अनिल अकाळ, शिक्षण अधिकारी विकास पाटील, व विशेष उपस्थित म्हणून शिक्षण विभागातील अधिकारी आत्माराम अनाळकर व प्रवीण वायाळ तसेच, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक तसेच तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची पाहणी करून त्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल चैतन्य गुरुकुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.