(चिखली):-विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील वाहतूक सुलभ करण्याच्या दृष्टीने आ. सौ.श्वेता महाले यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून दोन महत्त्वाच्या रस्त्यांवरील अडथळे दूर करण्यात येऊन संबंधित कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. या प्रक्रियेत चिखली तहसीलचे नायब तहसीलदार गायकवाड यांनी प्रशासनाच्या वतीने समन्वय साधून महत्त्वाची भूमिका बजावली.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 30 ऑक्टोबर 2025 रोजी मंजूर झालेला सवना येथील गजानन इंगळे यांचे शेत ते शेलुद हा तीन किलोमीटर लांबीचा शेतरस्ता काही कारणांमुळे अनेक दिवस बंद होता. प्रशासन व स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून हा रस्ता तीस फूट रुंदीने पूर्णपणे खुला करण्यात आला असून रस्त्याच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे.
तसेच पीएमजेएसवाय (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना) अंतर्गत मंजूर झालेला हराळखेड ते डूमा हा साडेतीन किलोमीटर लांबीचा रस्ताही गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित होता. या रस्त्यापैकी जवळपास दोन किलोमीटर भागाची आखणी करून तो मोकळा करण्यात आला असून चार जेसीबी मशिनच्या सहाय्याने आजच सुमारे चाळीस फूट रुंदीचा रस्ता तयार करण्यात आला. यानंतर ठेकेदारामार्फत पुढील बांधकाम कामालाही सुरुवात करण्यात आली आहे.
दोन्ही रस्ते खुले झाल्यामुळे संबंधित गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतीमाल वाहतूक, दळणवळण आणि ग्रामीण विकासाला चालना मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे..