चिखली विधानसभा मतदारसंघासाठी मंत्र्यांकडे केली ठाम मागणी...
चिखली(महेश गोंधणे):-तालुक्यातील लघु पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये निर्माण झालेल्या गंभीर मनुष्यबळ टंचाई व सोयी-सुविधांच्या अभावाबाबत व त्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील मायबाप शेतकऱ्यांच्या पशु व पशुपालकांना होणाऱ्या त्रास व मनस्तापाकडे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.श्वेता महाले यांनी राज्य सरकारच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा.ना.पंकजा मुंडे यांचे लक्ष वेधले आहे.
आ.श्वेता महाले यांनी यासंदर्भात पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. पंकजा मुंडे यांना एक निवेदन दिले असून,आ.श्वेता महाले यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यातील अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पशुसंवर्धन विभागातील महत्त्वाची पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत. केवळ दोन कर्मचाऱ्यांवर संपूर्ण कार्यालयाचा भार असल्याने पशुधन उपचार, सेवा, लसीकरण, विविध शासकीय योजनांचा लाभ पशुपालकापर्यंत पोहोचवणे व आकस्मिक उपचारांवर गंभीर परिणाम होत आहे.
ग्रामीण भागात पशुवैद्यकीय दवाखाने हे पशुपालकांसाठी अत्यंत आवश्यक केंद्र असून, आवश्यक औषधे, आधुनिक उपकरणे, प्रयोगशाळा सुविधा तसेच यंत्रणांचा अभाव असल्यामुळे उपचारांमध्ये अडचणी निर्माण होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. परिणामी पशुपालकांचे आर्थिक नुकसान होत असून शासनाच्या योजनांचा अपेक्षित लाभही पोहोचत नाही, असे आ.महाले यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर चिखली तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांतील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच प्रशासनातील त्रुटींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठोस मागणी आ.श्वेता महाले यांनी केली आहे.
शेतकरी व पशुपालकांच्या हितासाठी शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आ.महाले यांनी ग्रामीण पशुसंवर्धन व्यवस्था बळकट करण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे...