चिखली शहरात पॉलिथीन बॅगचा वापर बंद करावा...

 न.प. मुख्याधिकाऱ्यांना नागरीकांचे निवेदन    
चिखली (महेश गोंधणे) :-शासनाने पर्यावरणास हानी करणाऱ्या पॉलिथीन व तत्सव वस्तूंच्या वापरांवर बंदी घातलेली असतांनाही सर्वत्र पॉलिथीन बॅग सर्रासपणे वापरात येत असल्याचे दिसून येते. यामुळे पर्यावरणासह मानवी आरोग्याला अनेक प्रकारे धोका निर्माण होत असून चिखली शहरात सदर हानीकारक पॉलिथीन बॅग व तत्सम वस्तूंच्या वापरावर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी शहरातील सूज्ञ नागरीकांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचेकडे केली.सदर मागणीचे निवेदन शरद भाला,ओमप्रकाश गोंधणे,सुभाषआप्पा झगडे,माधव कुळकर्णी, नंदू पेडवाल ,विष्णु परिहार यांनी मुख्याधिकारी नगर परिषद यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार पर्यावरणास हानीकारक पॉलिथीन व तत्सम वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही सर्वत्र सदर वस्तूंचा सर्रासपणे वापर होतांना दिसतो. यामुळे शासनाच्या नियमाची पायमल्ली होत आहे. विशेषतः कॅरीबॅगचा वापर सगळीकडे सुरु आहे. यामुळे पर्यावरण व आरोग्यास हानी पोहोचत आहे. शहरातील सर्वच लहान-मोठे दुकानदार, व्यावसायीक, दूध विक्रेते, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते, मांस-मच्छी विक्रेते खुलेआम कॅरीबॅगचा वापर करतांना दिसतात. यामुळे मोकळ्या जागा, नाल्यांच्या काठावर तसेच रस्त्यांनवर हा कचरा फेकला जातो किंवा जाळण्यात येतो.
 याबाबत व्यावसायीकांना विचारणा केली असता घंटागाडी ठरलेल्या दिवशी व वेळी येत नसल्याने हा कचरा जाळून टाकत असल्याचे उत्तर त्यांचेकडून मिळाले. नगर परिषदेचे यासाठी योग्य नियोजन करुन स्वच्छ भारत अभियानात आपले शहर मागे नसल्याचे दाखवून दिले पाहिजे. यासाठी नागरीक सहकार्य करण्यास तयार आहेत. तसेच नगरात काही दुकानदार डिस्पोजल ग्लास, वाट्या, द्रोण, पत्रावळी विक्री करून पर्यावरण ऱ्हासाला हातभार लावत आहेत. यामुळे लग्न समारंभ, भंडारे, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात या साहित्याचा वापर सर्रासपणे करण्यात येतो. मंगल कार्यालये व लॉन्स मध्ये सुध्दा याचा वापर वाढलेला असून पर्यावरणास मोठी हानी होत आहे. तरी या गंभीर बाबीकडे विशेष लक्ष देवून शहर स्वच्छ ठेवावे आणि चिखली नगरात पॉलिथीन विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.सदर निवेदनावर मुख्याधिकारी नगर परिषद यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
या निवेदनावर येथील प्रतिष्ठीत व्यावसायीक शरद भाला, सुभाषआप्पा झगडे, माधव कुळकर्णी, किरण पिंपरकर, निलेश पाठक, अनिल तिडके, अशोक अग्रवाल, उद्धव तुपकर, नंदकिशोर गोंधणे आदींसह अनेक नागरीकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Previous Post Next Post