जनतेमध्ये जा! जनतेचे प्रश्न सोडवा! व जनतेतून उमेदवार म्हणून तुमचे नाव येऊ द्या!... — आ. सौ.श्वेता महाले पाटील
चिखली (महेश गोंधणे):- आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.श्वेता महाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चिखलीतील अंबिका अर्बन सभागृह येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
या बैठकीत चिखली विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद सर्कलमधील पंचायत समिती व जिल्हा परिषद उमेदवारी करिता इच्छुक कार्यकर्ते, कार्यरत पदाधिकारी,सर्व शक्ती केंद्रप्रमुख व बूथ प्रमुख उपस्थित होते.
यावेळीआ.श्वेता महाले म्हणाल्या,“आपल्याला फक्त निवडणुकी पुरतेच बाहेर पडायचे नाही नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्याचा प्रयत्न सातत्याने करायचा आहे.जनतेशी जोडून काम करणाऱ्या व्यक्तीच खरी लोकप्रतिनिधी बनतात.त्यामुळे आपल्या सर्कलमधील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचा,त्यांच्या समस्या समजून घ्या आणि त्यांचा विश्वास संपादन करा.”
“महायुतीचा धर्म पाळून आपल्या युतीतील जास्तीत जास्त उमेदवारांना पंचायत समिती व जिल्हा परिषद गणांत विजयी करण्यासाठी प्रयत्न करा.युतीचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आले असले तरी अंतिम उमेदवार जनता ठरवेल — कारण जनता हीच खरी निर्णयकर्ता आहे.”
यावेळी आ.श्वेता महाले यांनी इच्छुक जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांना जनतेमध्ये जाऊन शेवटच्या स्तरावर काम करण्याचे आवाहन केले. उमेदवारीच्या अनुषंगाने आणि जनतेच्या उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातून विविध सामाजिक उपक्रम,जनसंपर्क कार्यक्रम व शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या शिबिरांना त्या स्वतः उपस्थित राहून पाहणी करतील असे सांगत, “जे कार्यकर्ते प्रत्यक्ष जनतेशी जोडले जातील, त्यांचे सर्वेक्षण तालुका मंडळ प्रमुख करतील आणि त्यानंतरच उमेदवारी निश्चित केली जाईल,”असेही आ.श्वेता महाले यांनी स्पष्ट केले.
बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते,पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते.