चिखली शहरात 'अंगीकार अभियान-2025' ला उत्स्फूर्त प्रतिसाद...

गरजू कुटुंबांना मिळणार हक्काचे घर – आ. श्वेता ताई महाले पाटील यांचे मार्गदर्शन
चिखली(महेश गोंधणे): -शहरातल प्रत्येक गरजू कुटुंबाला हक्काचे घर मिळावे,त्यांचे स्वप्नातील घरकुल पूर्ण व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत ‘अंगीकार अभियान-2025’ चा शुभारंभ चिखली नगर परिषदेमार्फत करण्यात आला.या अभियानाचा उद्देश जास्तीत जास्त गरजू नागरिकांपर्यंत या योजनेची माहिती पोहचवणे व लाभ मिळवून देणे हा असून, या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या अभियानाचे उद्घाटन करताना चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आ.सौ. श्वेताताई महाले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की –“हक्काचे घर हे केवळ चार भिंती नसून,ते प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न, सुरक्षिततेचे ठिकाण आणि पुढील पिढ्यांसाठी वारसा आहे. गरीब व मध्यमवर्गीयांच्या डोळ्यांतील हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 सुरू केली असून ‘अंगीकार अभियान-2025’ हे त्याचे मूळ अधिष्ठान आहे. यातून लाभार्थ्यांना केवळ घरकुलच नाही, तर नियमानुसार जमीन व कायदेशीर सुरक्षितता देखील मिळणार आहे.”
आ.श्वेताताईंनी यावेळी भावनिक शब्दांत जनतेशी संवाद साधत म्हटले की,
“प्रत्येक आई-वडिलांना आपल्या लेकरांसाठी डोक्यावर छप्पर असावे असे वाटते.हीच भावना लक्षात घेऊन आम्ही प्रयत्नशील आहोत.या योजनेतून आपल्याला योग्य कागदपत्रांची पूर्तता करून दिली जाईल,हक्काची नोंदणी करून दिली जाईल व भविष्यात कोणत्याही अडचणीशिवाय घराचा अधिकार लाभेल.गरीब, शेतकरी, कामगार,महिलावर्ग व शहरातील भटक्या-व्यवसायिक वर्गासाठी ही योजना वरदान ठरणार आहे.”
या अभियानामुळे चिखली शहरातील हजारो लाभार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले असून, प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळत आहे.शहरातील नागरिकांचा विश्वास आणि समाधान हेच या अभियानाचे यश असल्याचे मत आ.श्वेता ताईंनी व्यक्त केले.
या प्रसंगी मुख्याधिकारी  प्रशांतजी बीडकर,पंडितदादा देशमुख,  सुहासजी शेटे,रामदासभाऊ देव्हढे, उपजिल्हा प्रमुख शिवाजीबापू देशमुख,भाजपा शहराध्यक्ष सागर पुरोहित,किसान आघाडी शहराध्यक्ष प्रशांत देशमुख,शिवसेना शहर प्रमुख विलासजी घोलप, शेख अनिसभाई, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शैलेश देशमुख,युवा मोर्चा शहराध्यक्ष विजय वाळेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध विभागातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 व ‘अंगीकार अभियान’ संदर्भात माहिती देत लाभार्थ्यांना जागरूक केले.
Previous Post Next Post