चिखली नगरपरिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर,भावी नगरसेवकांच्या स्वप्नांची होणार पूर्तता....

चिखली(महेश गोंधणे):-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या  अंमलबजावणीशी संबंधित निकालामुळे २०२२ पासून   रखडलेल्या होत्या. मात्र आता ३१ जानेवारी २०२६ पूर्वी कोर्टाने निवडणूक घेण्याचे अंतिम आदेश दिले .त्यामुळे सर्व नगरपालिका प्रशासनाने प्रभाग  रचना ३१ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करून नोव्हेंबर महिन्यात ईव्हीएम ची तयारी पूर्ण झाली पाहिजे असे आदेश कोर्टाने दिले आहे.  त्यानुसार चिखली मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारूप प्रभाग रचना तयार केली होती. नगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून राजकीय वातावरण तापले आहे.
चिखली नगर पालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य शासनाने जाहीर केला होता. त्यानुसार चिखलीतील १४ प्रभागांची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून. यामध्ये द्विसदस्यीय प्रभाग पद्धत राहणार असल्याने प्रभागात १४ नगरसेवकांची संख्या २८ राहणार आहे.प्रभाग रचना अंतिम झाल्याने भावी नगरसेवकांना प्रभागांच्या आरक्षण सोडतीचे वेध लागले आहेत.सार्वत्रिक निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जोरदार प्रशासकीय हालचाली सुरू झाल्याने चिखलीचे राजकीय वातावरण तापले आहे.
 या प्रारूप प्रभाग रचनेवर सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या.शासनाने आलेल्या हरकतींवर विचार करून प्रारूप प्रभाग रचना अंतिम केली आहे.
लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या माहितीसाठी चिखली पालिकेच्या सभागृहात अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
चिखली शहराची लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती, मतदारसंख्या, सामाजिक व सांस्कृतिक रचना यांचा विचार करून प्रभाग तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागात साधारण समान मतदारसंख्या ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे आगामी निवडणुकांत स्पर्धा अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.या संदर्भात मंगळवार ३०सप्टेंबर रोजी अधिसूचना जाहीर करण्यात आली असून या नवीन प्रभाग रचनेमुळे स्थानिक राजकारणात हालचालींना वेग आला आहे. अनेक इच्छुक उमेदवार आपापल्या प्रभागातील मतदारसंख्येचे गणित मांडू लागले आहेत. काही प्रभाग एकत्र आल्याने जुन्या राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. विशेषतः चिखलीच्या मध्यवर्ती भागात मतदारसंख्या मोठी असल्याने पक्षनिहाय रणनिती ठरवणे आव्हानात्मक ठरणार आहे.
चिखली पालिकेची आगामी निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय पक्षांची वेगाने  तयारी सुरू केली असल्याचे दिसते. उमेदवार निश्चिती,प्रचाराची आखणी आणि स्थानिक मतदारांशी संपर्क या सर्व हालचालींना वेग मिळणार आहे,नगरसेवक होण्याची आशा मनात ठेवून सर्वच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असून आपआपल्या परीने सर्वच पक्षातील इच्छुक( "मी होणार नगरसेवक' )तयारी करत आहे.
Previous Post Next Post