चांडोळ,मासरूळ,कोलारा, डोंगरशेवली व ढालसावंगी यांना मिळणार नवीन ग्रामपंचायत इमारत....

आ.सौ.श्वेता महाले यांच्या पाठपुराव्याला यश....
चिखली(महेश गोंधणे):- पुनर्रचित राष्ट्रीय ग्रामीण स्वराज्य अभियान 2025 26 अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायत यांना नवीन इमारत मिळणार असून त्यापैकी पाच इमारती चिखली विधानसभा मतदारसंघाला खेचून आणण्यात चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार विकास कन्या सौ श्वेताताई महाले यांना यश आले आहे.
ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज सुलभ होण्यासाठी संसदीय समितीच्या सूचनांनुसार ग्रामपंचायतींना पायाभूत सुविधा घटकांतर्गत नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारत आणि त्यासोबत नागरी सुविधा केंद्र खोली (CSC Room) मंजूर करण्यासाठी पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार यांच्या संपन्न झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींकरीता नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधकाम व नागरी सुविधा केंद्र खोली या उद्दिष्टाच्या अधीन राहून ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या ३००० पेक्षा अधिक आहे आणि त्यांना स्वमालकीची ग्रामपंचायत इमारत नाही, अथवा धोकादायक व गोडकळीस आलेली आहे अशा ग्रामपंचायतींचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केंद्र शासनाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात दिल्या होत्या.

संचालक, पंचायत राज यांनी वरील निकषानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडून ग्रामपंचायतींची यादी मागविली होती. त्यानुसार प्राप्त प्रस्तावानुसार बुलढाणा जिल्ह्यातील अकरा ग्रामपंचायतीच्या यादीस पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाच्या,राज्य कार्यकारी समितीची मान्यता घेवून पंचायत राज मंत्रालय,भारत सरकार यांना पुरवणी प्रस्ताव सादर केला होता.
 या सादर केलेल्या प्रस्तावाचा चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आ.सौ.श्वेताताई महाले यांनी विविध प्रकारे पाठपुरावा करून चिखली विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या अधिकाधिक ग्रामपंचायतींना नवीन इमारत मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. त्यानुसार केंद्र सरकारकडून बुलढाणा जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायत यांना नवीन इमारतीसाठी सुमारे प्रत्येकी 20 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त होणार असून या 11 ग्रामपंचायत पैकी पाच ग्रामपंचायती या चिखली विधानसभा मतदारसंघातील आहेत. या अभियानानुसार चिखली विधानसभा मतदारसंघातील चांडोळ,मासरूळ,कोलारा,डोंगर शेवली व ढाल सावंगी या ग्रामपंचायतींना नवीन ग्रामपंचायत इमारत मिळणार आहे.
Previous Post Next Post