चिखली (महेश गोंधणे):- चिखली शहरातील गजानन नगर भागात राहणार युवक रामेश्वर मधुकर खरात (वय ४०) या युवकाने चिखली ते जालना रोडवरील नॅजरीन चर्चच्या मागील बाजूला असलेल्या शेतातील लिंबाच्या झाडाला रूमालाच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल, दि.२७ जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, हा प्रकार आत्महत्याच आहे की घातपात आहे,याबाबत साशंकता निर्माण झालेली आहे.
सविस्तर वृत्त असे, की शहरातील गजानन नगरमधील रहिवासी रामेश्वर मधुकर खरात या युवकाचा नॅजरीन चर्चच्या मागील बाजूच्या शेतात लिंबाच्या झाडाला रुमालाच्या सहाय्याने गळफास घेऊन मृतदेह लटकलेला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली.त्यानंतर चिखली पोलिस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील, दुय्यम ठाणेदार हुसे आणि पोलिस शिपाई रोहिदास पंढरे यांनी घटनास्थळी येऊन पंचासमक्ष पंचनामा करून सदरचे प्रेत हे शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले.सदर युवकाने आत्महत्या केली, की काही घातपात आहे याचा तपास ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार हुसे आणि पोलिस शिपाई रोहिदास पंढरे हे करीत आहेत.गेली सहा सात महिन्यात रुमालाने गळफास लावून आत्महत्या केल्याची ही चवथी घटना आहे. सदर घटनेच्या तपासा अंती खर काय ते कळेल.