महेश गोंधणे:-आज हिंदूसूर्य महाराणा प्रताप जयंतीनिमित्त चिखलीमध्ये प्रतिमा पूजन, अभिवादन व मोटरसायकल रॅली उत्साहात संपन्न केली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रचंड मुघल सैन्य, अतुलनीय दारुगोळा, युद्धाच्या नवीन पद्धतींचे ज्ञान असलेले सल्लागार, हेरांची एक लांबलचक यादी व फसवणूक करूनही महाराणा प्रताप यांची मान खाली घालण्यात अकबर अपयशी ठरला. महाराणा प्रताप यांनी कसेही करून अकबराची अधीनता स्वीकारून 'दीन-ए-इलाही' धर्म स्वीकारावा अशी मुघलांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी महाराणा प्रतापांना अनेक मोहक संदेशही पाठवले, परंतु महाराणा प्रताप आपल्या निर्धारावर ठाम राहिले. महाराणा प्रताप "राजपूतांचा अभिमान, हिन्दुत्वाचे गौरव सूर्य" अशा संकटात देखील त्याग, तप व धर्म या करिता खंबीर राहिले, असे गौरवोद्गार आ.श्वेताताई यांनी या प्रसंगी केले.
आज सकाळी चिखली येथे महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शहराध्यक्ष सागर पुरोहित यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यावेळी हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे पूजन केले. दिवसाच्या पहिल्या ठोक्याला रात्री बारा वाजता महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. सकाळी सात वाजता महाराणा प्रताप सिंहजी यांच्या पुतळ्याचे पूजन व त्यांना दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी नऊ वाजता सर्व समाजबांधवांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वाजत गाजत गाड्यांना भगवे ध्वज बांधून व डोक्यावर भगवा फेटा किंवा भगवी टोपी परिधान केलेल्या हजारो नागरिकांच्या साक्षीने हिंदूसूर्य महाराणा प्रताप की जय हा जयघोष संपूर्ण चिखली शहरात निनादत होता. याप्रसंगी महिला भगिनी तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.तरुणाईचे नेतृत्व करत चिखली शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
तेजस्वी युगपुरुष म्हणून भारतीय इतिहासात अजरामर झालेले हिंदूसूर्य महाराणा प्रताप हे आपले असाधारण साहस, असीम पराक्रम, देशाभिमान, अपूर्व त्याग, आत्मसन्मान इत्यादी गुणांनी अलंकृत होते. त्यामुळे या देशाची संस्कृती जोवर टिकून आहे तोपर्यंत महाराणा प्रताप यांचे नाव देशाभिमान व आत्मसन्मानासाठी अडीग राहिलेला हिमालय म्हणूनच परिचित राहील. महाराणा प्रताप यांचे नाव संपूर्ण देशाला स्वातंत्र्य व स्वाभिमानाचा संदेश देत राहील असेही प्रतिपादन या वेळी आ.सौ श्वेताताई यांनी केले.त्यानंतर हिंदूसूर्य महाराणा प्रतापजी यांच्या प्रतिमेस सामूहिक अभिवादन केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.