आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी आतुर झाल्याने वाढदिवस सत्काराला उपस्थित राहू शकले ..आ.सौ श्वेताताई महाले

चिखलीः चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांचा वाढदिवस तालुका क्रीडा संकुल, चिखली येथे साजरा करण्यात आला याप्रसंगी
वाढदिवसाच्या दिवशी सामान्यांनी केलेल्या सत्कार समारंभात आभार व्यक्त करताना आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी आपल्याला सार्वजनिक रित्या वाढदिवस साजरा करायला आवडत नसल्याचे सांगून, राजकारणात आल्यानंतर पळसखेड दौलत येथे नदी खोलीकरणाचे उद्घाटन करून आपण पहिला सार्वजनिक वाढदिवस साजरा केल्याची आठवण त्यांनी सांगितली.

अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि अधिवेशनानंतर लगेचच पक्षाच्या अंतर्गत प्रशिक्षणासाठी जायचे असल्याने वाढदिवसासाठी मतदारसंघात येणे जमणार नव्हते, परंतु योग्य वेळी प्रशिक्षण रद्द झाल्याने आणी जवळपास तीन आठवडे मतदारसंघापासून दूर असल्याने एका दिवसासाठी का होईना आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी आतुर झालेले मन असल्याने वाढदिवस सत्काराला उपस्थित राहू शकल्याचे त्यांनी अतिशय भावनिक होऊन सांगितले.
काही महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतून आपल्याला खूप काही शिकायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अनुभवातून माणूस शहाणा होत असल्याने या अनुभवातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळाले असल्याची टिपणी त्यांनी केली. मागील पाच वर्षाच्या आपल्या कार्यकाळात आपण जातपात, धर्म व पक्ष विरहित विकासाभिमुख राजकारण केल्याचे त्यांनी सांगितले. एकदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी हा कुठल्याही जात पात, धर्म, पक्ष याच्या बंधनात अडकत नाही तर तो संपूर्ण जनतेचा लोकप्रतिनिधी असतो. त्याच भावनेतून आपण संपूर्ण गोरगरीब जनतेची सेवा करण्याचे व्रत अंगीकारले आणि शक्य होईल तितकी विकास कामे खेचून आणली. चिखली शहरासाठी करण्यात येणारी पाणीपुरवठा योजना असो की चिखली शहरातील अंतर्गत रस्ते असो किंवा गाव खेड्यातील आमच्या माय बहिणींच्या डोक्यावरील हंडा उतरवण्यासाठी जलजीवन मिशनची प्रचंड कामे असोत, शेतकऱ्यांसाठी पांधन रस्ते, गाव जोडणारी गावजोड रस्ते असोत, विकासाची जी कामे
माझ्यापर्यंत आली ती सर्व पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. आपल्या चिखलीला बारामती सारखी विकासात्मक ओळख निर्माण करण्यासाठी चिखली शहर, चिखली ग्रामीण आणी आपण सगळ्यांना हातात हात घालून काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ. श्वेताताई महाले यांनी केले. निवडणुकीनंतर आलेली काही नकारात्मकता असेल तर 'झाले गेले गंगेला मिळाले' त्याप्रमाणे सर्व नकारात्मकता महाकुंभाला ज्याप्रमाणे मी अर्पण केले, तसेच सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या काळातील नकारात्मकता मनातून काढून टाकून पुन्हा आपल्या चिखलीला सर्वांग सुंदर बनवण्यासाठी झटावे असे आवाहन सौ. महाले यांनी केले.
मागील एक दीड महिन्यापूर्वी विकृत मानसिकतेच्या कुणीतरी आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर, संरक्षण म्हणून पोलिसांनी आपल्याला अधिक सुरक्षा दिली असली तरी या सुरक्षिततेपायी मी आणी माझा जनसामान्याशी असलेला आपुलकीचा संबंध या मध्ये ही सुरक्षा व्यवस्था येत असल्याने उद्याच आपण ही अतिरिक्त सुरक्षा काढून घेण्याची विनंती पोलिसांना करणार असल्याचे सौ. श्वेता महाले म्हणाल्या. गुन्हेगारीच्या वृत्तीला कुठलीही जात व धर्म नसतो, माझे लोक माझा मतदारसंघ, माझी जनता व मी यांच्यामध्ये अगदी पोलिसांची सुरक्षा व्यवस्थाही यायला नको. माझ्या मतदारसंघात मला कसलीही भीती नाही, या मतदारसंघात माझ्या केसालाही कुणी धक्का लावू शकणार नाही! आणि मला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला तर मतदारसंघातील माझे लाखो बंधू माझ्या रक्षणासाठी येथे असल्याने मला कुणाची चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे सौ. श्वेताताई महाले म्हणाल्या.
सत्कारच्या नंतर सौ. श्वेता ताईच्या निरोगी व उदंड आयुष्यासाठी गोंधणे परिवाराकडून लाडुतुला करण्यात आली.
Previous Post Next Post