आ. सौ श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नातून सोयाबीन खरेदीसाठी बारदाना उपलब्ध; शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा

 आ. सौ श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नातून सोयाबीन खरेदीसाठी बारदाना उपलब्ध;  शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा



चिखली : महाराष्ट्रा राज्य  मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने राज्यात सध्या सोयाबीनची खरेदी शासनाच्या अधिकृत केंद्रांवर सुरू आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून बारदाना संपल्यामुळे ही सोयाबीन खरेदी खोळंबली  होती. परिणामी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर ताटकळण्याची पाळी आली होती. शेतकरी बांधवांची ही अडचण लक्षात घेऊन आ.  श्वेताताई महाले यांनी  नाफेड व राज्य शासनाकडे या संदर्भात पाठपुरावा केला.  त्याची फलनिष्पत्ती म्हणून राज्य सरकारकडून सोयाबीन खरेदी केंद्रांवर बारदाना उपलब्ध करून देण्यात आला आहे. या माध्यमातून तालुक्यातील  शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम आ. श्वेताताई  महाले यांनी केले आहे



                  सध्या राज्य शासनाकडून संपूर्ण राज्यात सोयाबीनची खरेदी शासनाच्या अधिकृत केंद्रामार्फत केली जात आहे. या ठिकाणी नाफेड मार्फत बारदाना उपलब्ध करून दिला जातो. परंतु, ज्या बारदाना पुरवठादार  कंपनीशी नाफेडचा  करार  होता;  त्या कंपनीकडून अद्याप बारदान्याचा पुरवठा न झाल्यामुळे सोयाबीन खरेदी केंद्रांवर बारदाना  टंचाई निर्माण झाली होती. त्याचा परिणाम म्हणून सोयाबीनची  खरेदी खोळंबून  शेतकरी वर्ग देखील अडचणीत आला होता. चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी ही बाब आ.  श्वेताताई महाले यांच्या कानावर घातली  असता श्रीमती महाले यांनी तातडीने पावले उचलली. 

आ. श्वेताताई महाले यांनी नाफेड आणि राज्य शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी यासंदर्भात संपर्क करून त्यांच्या कानावर शेतकऱ्यांची व्यथा घातली तसेच लवकरात लवकर या समस्येचे निवारण  करण्याबाबत सांगितले. आ.  महाले यांच्या या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून तातडीने सोयाबीन खरेदी केंद्रांवर आवश्यक असलेला बारदाना उपलब्ध करून देण्यासंबंधी हालचाली करण्यात आल्या आहेत. दि. ४  जानेवारीपासून तालुक्यातील  शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रांवर पुरेशा प्रमाणात बारदाना उपलब्ध राहणार असून त्यामुळे सोयाबीनची खरेदी आता पूर्ववत सुरू होईल. आ. महाले यांनी केलेल्या या प्रयत्नामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

Previous Post Next Post