अमरावती विभागीय पीक परिस्थितीच्या आढावा बैठकीत चिखली मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या...
(महेश गोंधणे) :-नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी, “शेतकरी वर्षभर कष्ट करून पिकाची काळजी घेतो; मात्र ऐन उत्पादनाच्या काळात पावसाने दगा दिल्याने त्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.पिकं करपली, शेतकरी हवालदिल झाला आहे अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबाची आणि उपजीविकेची चिंता लक्षात घेऊन मदत करणे गरजेचे आहे,” अशी भावना आ.श्वेता महाले यांनी अकोला येथील विभागीय बैठकीत व्यक्त केली.
पावसाने दिलेल्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप हंगामातील पिकांची अवस्था गंभीर झाली असून, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृहात अमरावती विभागातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. विभागातील पिकांची सद्यस्थिती, पावसाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी यांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची व्यथा आमदार श्वेता महाले यांनी अत्यंत आत्मीयतेने मांडली. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभे पीक करपताना पाहण्याची वेळ आली असून, विशेषतः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी कृषिमंत्र्यांकडे केली.
चिखली विधानसभा मतदारसंघातील विविध भागांत पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे सोयाबीनसह मूग, उडीद, कापूस, तूर आणि इतर खरीप पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. उपलब्ध पीक परिस्थितीच्या अहवालातही विविध पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी, वस्तुनिष्ठ पंचनामे आणि नुकसानीचे योग्य मूल्यांकन करण्याची मागणी आ.महाले यांनी केली.
दुष्काळसदृश परिस्थितीच्या निकषांबाबत आणि कोणत्या भागाचा समावेश झाला किंवा कोणता भाग वगळला याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या चर्चा सुरू आहेत. यावर आमदार महाले यांनी शेतकऱ्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या विषयावर चर्चा झाली असून,आज कृषिमंत्री यांनांदेखील चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा योग्य पद्धतीने विचार व्हावा यासाठी आपण सतत पाठपुरावा करत आहोत असे त्यांनी सांगितले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.वैरागड येथे नुकतीच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आ.श्वेता महाले यांनी ही परिस्थिती विभागीय आढावा बैठकीत मांडली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावरची व्यथा थेट शासनाच्या आढावा बैठकीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला.
शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे, त्यांच्या नुकसानीचा आवाज शासनापर्यंत पोहोचवणे आणि आवश्यक मदतीसाठी पाठपुरावा करणे ही आपली जबाबदारी असल्याचे आ.श्वेता महाले यांनी स्पष्ट केले.
यावेळी राज्यांचे कामगार मंत्री आकाश फुंडकर,मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड,आदिवासी मंत्री अशोक उइके,राज्यमंत्री इंद्रजीत नाईक आ.रणधीर सावरकर, यांच्यासह विभागातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते....
