▪️९ ते १४ एप्रिलदरम्यान व्याख्याने, स्पर्धा, रॅली, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
चिखली/(महेश गोंधणे ):-
सम्राट अशोक–फुले–आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२६, चिखली यांच्या वतीने ०९ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध प्रबोधनात्मक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. महापुरुषांनी दिलेल्या समता, बंधुता व न्यायाच्या विचारांचा प्रसार व्हावा, तसेच त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवार, दि. ०९ एप्रिल २०२६ :सकाळी ८.०० वाजता सम्राट अशोक या लोककल्याणकारी शासकाला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी ९.०० वाजता धम्म ध्वजारोहण व सामूहिक बुद्धवंदना आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ७.०० वाजता लेखक, कवी व व्याख्याते नितीन सुभाष चंदनशिवे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर होणार आहे.
शुक्रवार, दि. १० एप्रिल २०२६ :सायंकाळी ७.०० ते रात्री १०.०० या वेळेत भीमगीत कराओके स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.शनिवार, दि. ११ एप्रिल २०२६ :सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त सायंकाळी ७.०० वाजता प्रा. डॉ. प्रतिभाताई अहिरे यांचे व्याख्यान होणार आहे.
रविवार, दि. १२ एप्रिल २०२६ :सायंकाळी ७.०० वाजता प्रबोधनकार अविनाश भारती यांचे “हे व्याख्यान तुमची झोप उडवेल” या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
सोमवार, दि. १३ एप्रिल २०२६ :सायंकाळी ७.०० वाजता सुप्रसिद्ध गायिका भाग्यश्री इंगळे यांचा भीमगीतांचा ऑर्केस्ट्रा सादर होणार असून रात्री १२.०० वाजता फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे.
मंगळवार, दि. १४ एप्रिल २०२६ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती) :सकाळी ७.३० वाजता धम्म वंदना तसेच आजी-माजी सैनिकांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली जाणार आहे. सकाळी ८.०० वाजता ऑटो, कार व मोटरसायकलद्वारे संपूर्ण चिखली शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे.सकाळी १०.०० वाजता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांचे मार्गदर्शन व गुणवंतांचा सत्कार होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. आयु. वैभवजी खरात सर (School of Economics, JNU Delhi) यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान होणार आहे.सायंकाळी ५.०० वाजल्यापासून शहरातील विविध नगरांमधून मिरवणुका काढण्यात येणार असून त्या सम्राट अशोक–फुले–आंबेडकर वाटिकेत एकत्र येतील. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.या उत्सवात संभाजी नगर, गजानन नगर, भीमनगर, पुंडलिक नगर, चैतन्य नगर, सैनिक नगर, सिद्धार्थ नगर, जिजाऊ नगर, गांधी नगर, लुंबीनी नगर, भीमक्रांतीनगर, भीमज्योती नगर, एकता नगर,शाहू नगर,शेलुद आदी भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.तसेच महिला मंडळ, युवक मंडळ, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार, वकील, डॉक्टर, कलाकार व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.सम्राट अशोक–फुले–आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या पदाधिकारी, सदस्य, सल्लागार व मार्गदर्शकांनी सर्व नागरिकांनी कुटुंबीयांसह उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.

